बहुजन महामोर्चाची जय्यत तयारी

By Admin | Published: January 14, 2017 12:13 AM2017-01-14T00:13:44+5:302017-01-14T00:18:49+5:30

उस्मानाबाद : बहुजन समाजातील विविध जाती-जमाती, संघटनांच्या वतीने येत्या १७ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर बहुजन मूक महामोर्चाचे आयोजन करण्यात आले

Bahujan Maha Morcha's preparation for the city | बहुजन महामोर्चाची जय्यत तयारी

बहुजन महामोर्चाची जय्यत तयारी

googlenewsNext

उस्मानाबाद : बहुजन समाजातील विविध जाती-जमाती, संघटनांच्या वतीने येत्या १७ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर बहुजन मूक महामोर्चाचे आयोजन करण्यात आले असून, संयोजन समितीच्या वतीने या मोर्चाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. मोर्चात विविध ६० जाती-जमातींचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक सहभागी होणार असल्याची माहिती बहुजन न्याय हक्क अधिकार संरक्षण समितीच्या वतीने शुक्रवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली.
ओबीसी समाजास सर्व क्षेत्रात ५२ टक्के आरक्षणाची तरतूद करावी, तसेच त्यानुसार राज्य आणि केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात निधी नियोजित करावा, अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टची कठोर अंमलबजावणी करून दोषींची संपत्ती जप्त करावी, महिलांवर अन्याय-अत्याचार करणाऱ्या बलात्काऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी, कष्टकरी बहुजनांची सर्व प्रकारची कर्जे माफ करावी, बहुजन विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत महागाई निर्देशांकानुसार वाढ करावी, बहुजनांच्या आरक्षणात घुसखोरी बंद करावी, लिंगायत धर्मास स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता द्यावी, सच्चर कमिटीच्या शिफारशींची तातडीने अंमलबजावणी करावी, शेती, विमा, खाजगी शैक्षणिक संस्था, कंपन्या, तसेच बेकायदेशीर संपत्तीचे राष्ट्रीयीकरण करावे, वडार समाजाच्या एसटी प्रवर्गात समावेश करावा, सोनार व्यावसायिकांना प्रशासनाकडून होणारा त्रास बंद करावा, बहुजनांची जातनिहाय जनगणना करावी, दारू, जुगारासह अवैध व्यवसाय कायमस्वरुपी बंद करावे, बाबू जगजीवनराम आयोगाची स्थापना करावी, आदिवासी पारधी समाजाची नोकरभरती सरळसेवा एकाच वेळी करावी, धनगर समाजाचा एसटी प्रवर्ग अंमलबजावणी व्हावी, अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या शिवस्मारकात जीवा महाले, शिवा काशीद यांच्यासह मावळे सरदारांचेही स्मारक उभारावे, तंटामुक्त समिती तसेच ग्रामसभाची पद्धत बंद करावी, बहुजन वस्त्यांवर होणाऱ्या हल्ल्याविरुद्ध संघटित गुन्हेगारी कलमान्वये कार्यवाही करावी आदी प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.
सुमारे ५५ ते ६० जाती, जमातींच्या प्रतिनिधींनी मोर्चात सहभाग नोंदविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या मोर्चाच्या माध्यमातून बहुजन समाजातील विविध जाती, जमाती एकत्र येत आहेत. ही बाब आमच्यासाठी सर्वात महत्वाची असल्याचे सांगत, येणाऱ्या दिवसात आणखी काहीजण यात सहभागी होणार आहेत. त्यामुळे बहुजन मूक मोर्चाच्या वतीने देण्यात येणाऱ्या निवेदनातील मागण्याही वाढतील, असे यावेळी सांगण्यात आले.
शहरातील जत्रा फंक्शन हॉल येथे झालेल्या या पत्रकार परिषदेला माजी नगराध्यक्ष दत्ता बंडगर, माजी नगरसेवक धनंजय शिंगाडे, माजी जि.प. सदस्य भारत डोलारे यांच्यासह मुकेश नायगावकर, सुनील काळे, संजय वाघमारे पांडुरंग लाटे, सतीश कसबे, दादासाहेब जेटिथोर, अमोल पेठे, रवी कोरे-आळणीकर आदींसह पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)

Web Title: Bahujan Maha Morcha's preparation for the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.