लोहारा तहसीलवर ‘प्रहार’चा बैलगाडी मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2018 06:37 PM2018-10-09T18:37:03+5:302018-10-09T18:42:50+5:30
उस्मानाबाद जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाकडून आज लोहारा तहसील कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला.
लोहारा (उस्मानाबाद ) : उस्मानाबाद जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाकडून आज लोहारा तहसील कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
पावसाअभावी खरीप हंगाम हातचा गेला आहे. असे असतानाही खरीप पिकाची आणेवारी ६० पैसे पेक्षा अधिक असल्याचा अहवाल प्रशासनाने शासनाकडे पाठविला आहे. हा अहवाल शेतकऱ्यांवर अन्याय करणारा आहे. त्यामुळे प्रशासनाने नव्याने वस्तुनिष्ठ पैसेवारी जाहीर करावी, शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रूपये मदत द्यावी, चारा छावण्या तातडीने सुरू कराव्यात, शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करावे आदी मागण्यांसाठी मंगळवारी प्रहार जनशक्ती पक्षाकडून शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून बैलगाडी मोर्चा काढण्यात आला.
शहरातील मुख्य मार्गाने हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. परंतु, मागण्यांचे निवेदन स्वीकारण्यासाठी कोणीही अधिकारी कार्यालयाच्या बाहेर येत नसल्याचे लक्षात आल्यानंतर घोषणाबाजी करीत कार्यकर्ते तहसीलमध्ये घुसले. मरत्र, कार्यालयातही तहसीलदार अथवा नायब तहसीलदार कोणीच हजर नव्हते. त्यामुळे ‘प्रहार’च्या कार्यकर्त्यांनी तहसीलदारांच्या रिकाम्या खुर्चिला हार घालून निवेदन देण्याचा निर्णय घेतला असता, काहीकाळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. यानंतर अव्वल कारकुन बालाजी चामे यांना मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी आण्णासाहेब दराडे, अॅड. जयपाल पाटील, मनोज जाधव, महमंद आत्तार, दत्ता झिंगाडे, वामन मुळे, बालाजी बनसोडे, जिंदावली मोमिन, किसन कुलकर्णी, उमरआली शेख, जुबेद शेख, शमशोद्दीन शेख, हैदर शेख, रमेश नागरगोजे, कालीदास घुगे, जयपाल पाटील, उमेश गवळी, महादेव जाधवर, फारुक शेख आदींची उपस्थिती होती.