बळीराजाने धरली चाढ्यावर मूठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:21 AM2021-06-30T04:21:23+5:302021-06-30T04:21:23+5:30
(फोटो : सुशील शुक्ला २९) परंडा : जिल्ह्याच्या बहुतांश भागात खरीप पेरण्या संपत आल्या असल्या, तरी परंडा तालुक्यात मात्र ...
(फोटो : सुशील शुक्ला २९)
परंडा : जिल्ह्याच्या बहुतांश भागात खरीप पेरण्या संपत आल्या असल्या, तरी परंडा तालुक्यात मात्र अद्याप पेरणीयोग्य पावसाने हजेरी लावलेली नव्हती. त्यामुळे शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होता. अखेर मागील दोन दिवसांत तालुक्याच्या अनेक भागात पावसाने चांगली हजेरी लावल्याने बळीराजाने चाढ्यावर मूठ धरली असून, अनेक शेतकरी पेरणीसाठी भाडोत्री ट्रॅक्टरचा वापर करीत असल्याचे दिसत आहे.
तालुक्यात मृग नक्षत्र कोरडे गेल्यानंतर रोहिणी नक्षत्राच्या पावसाने काही भागात तुरळक व मध्यम स्वरूपाची हजेरी लावल्याने काही शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरणीला सुरुवात केली. मात्र, जमिनीत पुरेशी ओल नाही आणि पाऊसही थांबल्याने शेतकरी पेरण्या थांबवून पेरणीयोग्य पावसाच्या प्रतीक्षेत होते. अखेर मागील दोन दिवसात बहुतांश भागात कमी-अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली. यामुळे पेरण्यांना प्रारंभ झाला आहे. तालुक्यात नामांकित कंपनीचे तूर, उडीद, सोयाबीन आणि मूग बियाणांचा तुटवडा भासत आहे. शिवाय, अनेक शेतकरी पेरणीसाठी ट्रॅक्टरचा वापर करीत असले, तरी सातत्याने वाढत असलेल्या इंधन दरवाढीमुळे पेरणी व शेती मशागतीचा खर्च दिवसेंदिवस वाढतच आहे.
तालुक्याची पावसाची सरासरी ६१५ मिलिमीटर असून, २८ जूनपर्यंत ९६ मिलिमीटर पाऊस झाला आहे. ८० ते १०० मिलिमीटर पाऊस पडल्यावरच शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी करावी. अन्यथा दुबार पेरणीच्या संकटाला सामोरे जावे लागेल, असा कृषी अधिकाऱ्यांचा सल्ला आहे. त्यामुळे काही भगातील शेतकरी अजूनही पेरणीयोग्य पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.