बळीराजाची व्यथा संपेना; पेरलेलं उगवलं नाही, गळफास लावून शेतकऱ्याची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2022 07:51 PM2022-07-04T19:51:24+5:302022-07-04T19:52:17+5:30
शेतकऱ्याने नैराश्यातून आपल्याच शेतातील चिंचेच्या झाडाला दाेरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली.
ढाेकी (जि. उस्मानाबाद) -खरीप हंगामात पेरणी केली. परंतु, पावसाअभावी पेरलेलं उगवलंच नाही. यातून आलेल्या नैराश्यातून एका ४६ वर्षीय शेतकर्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना ४ जुलैच्या पहाटे साडेपाच वाजता उस्मानाबाद तालुक्यातील तावरजखेडा शिवारात घडली.
तावरजखेडा येथील शेतकरी संजय शामराव फेरे (४६)यांनी मागील आठवड्यात स्वतःच्या शेतामध्ये सोयाबीनची पेरणी केली होती. मात्र, यानंतर पाऊस पडला नाही. त्यामुळे पेरलेलं बियाणं उगवलं नाही. यातून आलेल्या नैराश्यातून संजय फेरे यांनी आपल्या शेतातील चिंचेच्या झाडाला दाेरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना साेमवारी पहाटेच्या सुमारास घडली. या प्रकरणी विशाल श्रीकृष्ण फेरे यांनी दिलेल्या माहितीवरून ढाेकी पाेलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे. पुढील तपास बिट अंमलदार संजीवन जाधवर हे करीत आहेत. मयत संजय फेरे यांच्या पश्चात पत्नी, एक अंध मुलगी, मुलगा असा परिवार आहे.
बॅंकेचे ८५ हजारांचे कर्ज
मयत संजय फेरे यांच्या मालकीच्या जमिनीवर काेंड येथील महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेचे ८५ हजारांचे कर्ज आहे. आर्थिक संकटातून मार्ग काढत त्यांनी जवळपास अडीच एकर क्षेत्रावर साेयाबीनची पेरणी केली. मात्र, पावसाअभावी बियाणाची उगवण झाली नाही. जवळचे पैसे गेले अन् बियाणेही उगवले नाही. त्यामुळे बॅंकेच्या कर्जाची परतफेड करायची कशी? या विवंचनेतून त्यांनी असे टाेकाचे पाऊल उचलले, असे कुटुंबियांकडून सांगण्यात आले.