बळीराजाची व्यथा... सततच्या लॉकडाऊनमुळे 5 एकरवरील टरबूज बनलं जनावरांचा घास
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2021 04:33 PM2021-06-03T16:33:48+5:302021-06-03T16:34:16+5:30
मराठवाड्यात आजही पारंपरिक पिकावर शेतकऱ्यांचा भर राहिला आहे. मात्र, बदलत्या काळाच्या ओघात काही शेतकऱ्यांनी पीकपद्धतीत बदल केले. त्यातही उत्पादन वाढीपेक्षा नुकसानीचाच त्यांना सामना करावा लागत आहे.
मुंबई/उस्मानाबाद - कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेचा शेतकऱ्यांनाही चांगलाच फटका बसला आहे. शेतकऱ्यांना माल विकण्यास परवानगी देण्यात आली असली, तरी लॉकडाऊनमुळे ग्राहक मिळत नाही, मिळालं तरी कमी किंमतीत माल विकावा लागत आहे. उस्मानाबाद जिल्ह्याच्या देवळाली येथील एका शेतकऱ्याने चक्क 5 एकर कलिंगड जनावराच्या दावणीला बांधलं आहे. लॉकडाऊनमुळे बाजारात किंमत नसल्यानं ही वेळ आल्याचं शेतकरी यांनी म्हटलंय.
मराठवाड्यात आजही पारंपरिक पिकावर शेतकऱ्यांचा भर राहिला आहे. मात्र, बदलत्या काळाच्या ओघात काही शेतकऱ्यांनी पीकपद्धतीत बदल केले. त्यातही उत्पादन वाढीपेक्षा नुकसानीचाच त्यांना सामना करावा लागत आहे. नैसर्गिक संकटासोबत आता कोरोनाच्या महासंकटामुळे बागायतदार शेतकऱ्यांनाही समस्यांचा सामना करावा लागत आहे. भाऊसाहेब गायकवाड यांना देवळाली शिवारात 21 एकर क्षेत्र आहे. उत्पादन वाढीच्या दृष्टीने त्यांनी गतवर्षी 3 एकरात दोडक्याची लागवड केली. मात्र, लॉकडाऊनमुळे दोडके हे वेलालाच वाळून गेले. गतवर्षी झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी यंदा फेब्रुवारी महिन्यात भाऊसाहेब आणि त्यांचे बंधू नानासाहेब गायकवाड यांनी तब्बल 5 एकरात टरबूज पिकाची लागवड केली, पण यंदाही पुन्हा एप्रिल, मे आणि जून महिन्यातील लॉकडाऊनमुळे त्यांचे अतोनात नुकसान झाले.
3 लाखांच्या उत्पादनावर लॉकडाऊनने पाणी फेरले
फवारणी, मशागत आणि औषधसाठी गेल्या चार महिन्यात 50 हजार रुपये खर्च करण्यात आले. अविरत परिश्रमाच्या जोरावर एक नग 6 ते 7 किलोचा झाला होता. किमान 3 रुपये किलोप्रमाणे दर मिळाला तरी 3 लाखाचे उत्पादन होईल, असा आशावाद होता. मात्र, काढणीच्या प्रसंगी असलेल्या लॉकडाऊनमुळे त्यांच्या फडावर व्यापारीच फिरकले नाहीत. शिवाय सर्व बाजारपेठा बंद असल्याने विक्री कुठे करावी? हा प्रश्न निर्माण झाल्याने त्यांच्या स्वप्नांवर पाणीच फेरले.
काढणी खर्च टाळण्यासाठी फुकटात टरबूज
भाऊसाहेबांच्या शेतात डेरेदार टरबूज पडून आहेत. आता खरीपासाठी क्षेत्र रिकामे करण्याच्या दृष्टीने वावरात पडलेली टरबूज जनावरांच्या दावणीवर जात आहेत. भरघोस उत्पादनाऐवजी आता शेतातील टरबूज बाहेर काढण्यासाठी गायकवाड यांना 15 हजाराचा खर्च आहे. कोरोनामुळे मृत्यूच्या संख्येत वाढ होत आहे, त्यामुळे या नुकसानीकडे लक्ष तरी कोण देणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे फुकट टरबूज घेऊन जाण्याचं आवाहन त्यांनी गावकऱ्यांना केलं.
गावातील वाढत्या कोरोनामुळे कुणीच फिरकेना
गावात वाढती कोरोना रुग्णांची संख्या आणि निर्माण झालेले वातावरण यामुळे फुकटही कोणी घेऊन जाण्यास धजत नाही. खर्च टाळण्यासाठी अख्ख कुटुंब राबतंय. उत्पादन नाही किमान काढणीला अधिकचा खर्च होऊ नये, म्हणून गायकवाड कुटुंबातील सर्व सदस्य हे टरबूजाच्या फडात राबले. टरबूजाची जोपासना करण्यात जे हात राबत होते. त्याच हातांनी हे टरबूज जनावरांच्या दावणीवर टाकण्याची नामुष्की या शेतकरी कुटुंबीयांवर आली.