बँक कर्मचाऱ्यांना लसीकरणाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:31 AM2021-04-06T04:31:13+5:302021-04-06T04:31:13+5:30
उस्मानाबाद : कोरोना साथीच्या गेल्या वर्षभरात बँक अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सक्षमपणे सेवा बजाविली आहे. दैनंदिन कामकाज करताना त्यांचा अनेक ग्राहकांशी संपर्क ...
उस्मानाबाद : कोरोना साथीच्या गेल्या वर्षभरात बँक अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सक्षमपणे सेवा बजाविली आहे. दैनंदिन कामकाज करताना त्यांचा अनेक ग्राहकांशी संपर्क येतो. वित्तीय सेवेत कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही प्राधान्याने लस द्यावी, अशी मागणी राज्य सहकार परिषदेचे संचालक दत्ता कुलकर्णी यांनी सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.
बँकिंग क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींच्या संपर्कात अनेक व्यक्ती दैनंदिन व्यवहाराच्या माध्यमातून येत असतात. कोरोनाच्या प्रादुर्भावाबाबतचे सर्व नियम पाळूनच बँकिंगचे कामकाज होत असले तरीही बँकिंग क्षेत्रातील व्यक्तींना कोरोना संसर्गाचा धोका अधिक प्रमाणात आहे. मागील लॉकडाऊनचा काळ असो की कोरोना संसर्गाचा उद्रेक काळ, या दोन्हीतही जोखीम घेऊन अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सेवा दिली आहे. वित्तीय सेवा ही सर्वसामान्यांच्या जीवनचक्राचा कणा आहे. त्यात कोरोनाच्या साथीमुळे कोणीतीही बाधा येऊ नये, याची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील सर्व बँका, सहकारी बँक, खासगी बँक, मल्टिस्टेट, पतसंस्था व आर्थिक क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांना सरकारने प्राधान्याने लसीकरण करावे, अशी मागणी राज्य सहकार परिषद तसेच सोलापूर जनता सहकारी बँकेचे संचालक दत्ता कुलकर्णी यांनी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.