बँका सुरू ठेवण्यास मिळाली मुभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:31 AM2021-05-16T04:31:39+5:302021-05-16T04:31:39+5:30
उस्मानाबाद : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता, जिल्हा प्रशासनाने २४ मे पर्यंत ‘जनता कर्फ्यू’ पाळण्याचे आदेश काढले आहेत. ...
उस्मानाबाद : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता, जिल्हा प्रशासनाने २४ मे पर्यंत ‘जनता कर्फ्यू’ पाळण्याचे आदेश काढले आहेत. या कालावधीत वैद्यकीय व इतर काही अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण आस्थापना बंद ठेवण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. मात्र, आदेशात बँकांचा उल्लेख नसल्याने संभ्रम निर्माण झाला होता. यानंतर शनिवारी बँका सुरू ठेवण्यास निर्बंधातून सूट देण्यात आल्याचे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी काढले आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोनाचा उद्रेक रोखण्यासाठी ब्रेक दि चेन अभियानांतर्गत लागू असलेले निर्बंधांची अंमलबजावणी सुरू होती. दरम्यान, यात काही अत्यावश्यक सेवांना सवलत देण्यात आलेली आहे. मात्र, त्यामुळे गर्दी होत असल्याचा दावा करीत जिल्हा प्रशासनाने काही संघटना, नागरिकांची मागणी लक्षात घेता जिल्ह्यात जनता कर्फ्यू पाळण्याचे आदेश शुक्रवारी रात्री काढले आहेत. १५ मे रोजी सकाळी ७ वाजेपासून ते २४ मे रोजीच्या सकाळी ७ वाजेपर्यंत हे आदेश लागू असणार आहेत. दरम्यान, या आदेशात बँकांचा कसलाही उल्लेख नसल्याने व्यापारी, नागरिक व बँकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. काही व्यापाऱ्यांनी आमदार कैलास पाटील यांच्याशी संपर्क करून त्यांच्याकडे ही कैफियत मांडली. आ. पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी याविषयी चर्चा करून संभ्रम दूर करण्याबाबत सांगितले. यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी शनिवारी एक आदेश काढत जनता कर्फ्यूच्या आदेशात बँका बंद ठेवण्याबाबत कोणतीही सूचना दिलेल्या नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयीकृत, सहकारी, खासगी बँका या सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत नागरिकांसाठी चालू राहतील. त्यानंतर प्रवेशद्वार बंद करून केवळ कार्यालयीन कामकाज करता येईल, असे या आदेशाद्वारे कळविले आहे.
दुधाबाबतीतही निर्णय आवश्यक
बेकरी बंद राहिल्याने कोणी उपाशी राहत नाही. मात्र, हॉटेल्स बंद ठेवल्याने रुग्णांच्या नातेवाईकांची मोठी कसरत होत आहे. दरम्यान, शहरातील काही संस्था, पदाधिकाऱ्यां सामाजिक भान जपत रुग्णांच्या नातेवाईकांसाठी अन्नदानाचे कार्य सुरू केल्याने बऱ्यापैकी गैरसोय कमी झाली. परंतु, दूध विक्री करणारे केंद्र बंद ठेवण्याबाबतही असाच संभ्रम कायम आहे. जनता कर्फ्यूच्या आदेशात दुधाबाबतीत कोणताही उल्लेख नाही. त्यामुळे विक्री केंद्र बंद राहिले. परिणामी, लहान बालकांसाठी अत्यावश्यक असलेले दूध शनिवारी मिळू शकले नाही. सकाळी किमान दोन तासांसाठी का होईना, दूध विक्री सुरू ठेवण्यास मुभा देणे गरजेचे आहे.
रस्त्यावरील वर्दळ कमी होईना...
जनता कर्फ्यू लागू असला, तरी शनिवारी मुख्य रस्त्यांवर वर्दळ कायम असल्याचे दिसून आले. पोलीस छत्रपती शिवाजी महाराज चौक व अन्य भागातही काही ठिकाणी तपासणी, कारवाई करताना दिसले. मात्र, समोर पोलीस दिसताच चकवा देऊन दुसऱ्या मार्गाने पळ काढणारे वाहनधारकही याठिकाणी दिसून येत होते. रस्त्यावरील वाहनांची वर्दळ पाहता, हे सर्वजण खरेच वैद्यकीय कारणास्तव फिरत असतील का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.