कर्जमुक्ती योजनेमुळे पीककर्ज वाटपात बँका मेहरबान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:31 AM2021-03-21T04:31:16+5:302021-03-21T04:31:16+5:30
उस्मानाबाद : महाविकास आघाडी सरकारने महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत २ लाखांपर्यंत पीककर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली ...
उस्मानाबाद : महाविकास आघाडी सरकारने महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत २ लाखांपर्यंत पीककर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली होती. जिल्ह्यातील ६९ हजार ५८२ शेतकऱ्यांचे ५०३ कोटी ९९ लाख रुपयांचे कर्ज माफ झाले आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीमुळे मागील पाच वर्षांच्या तुलनेत बँका पीककर्ज वाटपात मेहरबान झाल्या असून, वर्षभरात १ लाख ५१ हजार ६७० शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप झाले आहे. शेतकऱ्यांना शेतीकामासाठी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी दरवर्षी खरीप व रब्बी हंगामात पीककर्ज वाटप केले जाते. त्यासाठी जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँका, सहकारी बँका, जिल्हा बँकेस कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात येत असते. शेतकऱ्यांकडून कर्जाची परतफेड राहिल्यामुळे अनेक बँका शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्यास नकारघंटा दर्शवीत असल्याचे दिसून येत होते. मात्र, गतवर्षी महाविकास आघाडी सरकारने महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत २ लाखांपर्यंतचे पीक कर्ज माफ करण्यात येईल, अशी घोषणा केली होती. त्यानुषंगाने जिल्ह्यातील ६९ हजार ५८२ शेतकऱ्यांचे ५०३ कोटी ९९ लाख रुपयांचे कर्ज माफ झाले आहे. कर्जमाफीमुळे बँका शेतकऱ्यांना कर्जवाटपासाठी पुढे सरसावल्याचे मागील पाच वर्षांच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. या वर्षभरात १ लाख ५१ हजार ६७० शेतकऱ्यांना ११८६ कोटी १५ लाखांचे कर्ज वितरण झाले.
पीक कर्जाची आकडेवारी
२०१६-१७ १६४१७०
११६९३४
२०१७-१८ १८६७६३
६४७५७
२०१८-१९ १९७१०३
७३३६७
२०१९-२० २२७२२२
६०७२१
२०२०-२१ २२७२२२
११८६१५
६९,५८२
कर्जमुक्तीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांची संख्या
कोट...
जिल्ह्यातील बँकांना या वर्षी २ हजार २७२ कोटींचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. बँकांनी फेब्रुवारी अखेरपर्यंत १ लाख ५१ हजार ७६० शेतकऱ्यांना १ हजार १८९ कोटी २२ लाखांचे पीककर्ज वितरित केले आहे. या वर्षी मागील चार वर्षांच्या तुलनेत अधिक कर्जवाटप वाढले आहे.
- नीलेश विजयकर, अग्रणी बँक प्रबंधक, उस्मानाबाद
प्रतिक्रिया...
१ लाख ७० हजार रुपयांचे बँकेकडून पीक कर्ज घेतले होते. मे २०२० मध्ये महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर्ज माफ झाले आहे. त्यानंतर मे महिन्यात बँकेकडे पीककर्जाची मागणी केली होती. बँकेने १ लाख ६० हजार रुपयांचे पीक कर्ज दिले आहे.
- बळीराम सावंत, शेतकरी, वलगुड
शेतीकामासाठी बँकेकडून १ लाख ३२ हजार रुपयांचे पीक कर्ज घेतले होते. दुष्काळ, नापिकीमुळे कर्जफेड झाली नाही. शासनाच्या महात्मा फुले योजनेअंतर्गत कर्जमुक्ती मिळाली. या वर्षी बँकेने दीड लाख रुपयांचे कर्ज दिले आहे.
- धोंडीराम बिराजदार, शेतकरी, सुतपगाव