केवळ घोषणांचा आधार ; निराधारांना एक हजाराची मदत कधी मिळणार ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:33 AM2021-05-09T04:33:39+5:302021-05-09T04:33:39+5:30
राज्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गास रोखण्यासाठी यापूर्वीही कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. मात्र, कोरोनाबाधितांची ...
राज्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गास रोखण्यासाठी यापूर्वीही कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. मात्र, कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागल्याने १३ एप्रिल रोजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी निर्बंध अधिक कडक करण्याची घोषणा केली होती. शिवाय, संचारबंदीही लागू केरण्यात आली. या काळात निराधारांना थोडाफार दिलासा मिळाला म्हणून संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ योजना, निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती योजना आदी योजनांतर्गत असलेल्या निराधार लाभार्थ्यांसाठी एक हजार रुपये देण्याची घोषणा केली होती. मात्र, जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांना अद्यापही एक हजार रुपयांची मदत मिळाली नाही. शासनाने लवकरात लवकर मदत देणे अपेक्षित आहे. ही मदत केव्हा मिळणार याकडे निराधार लाभार्थ्यांचे लक्ष लागले आहे.
कोरोनामुळे आम्हाला घराबाहेर निघता येत नाही. शासनाने संचारबंदी लागू करीत असताना १ हजार रुपयांची रक्कम निराधार, वृध्दांना, अपंगांना देत असल्याचे सांगितले. मात्र शासनाची मदत मिळाली नाही.
पंढरी शिंदे, लाभार्थी
शासनाने संचारबंदीमुळे एक हजाराची मदत जाहीर केल्याची वार्ता कानावर आली. परंतु, मदत केल्याचे पैसे आमच्या खात्यात आलेच नाहीत. शासन कधी मदत करते, याकडे लक्ष लागले आहे.
कुसुम देडे, लाभार्थी
महागाईचा विचार करता शासनाने अनुदानाची रक्कम वाढविणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे अनुदान काढण्यासाठी बँकांत जावे लागते. खासगी बँका वेळेवर अनुदान वर्ग करीत नाहीत. शासनाने याकडे लक्ष द्यावे.
विठ्ठल गायकवाड, लाभार्थी
एप्रिल, मे या दोन महिन्यांचे अनुदान बँक खात्यात जमा झाले होते. ते पैसे काढले आहेत. मात्र, १ हजार रुपयांची मदत मिळाली नाही.
सुदामती उदरे, लाभार्थी
कोट....
निराधार, दिव्यांग व्यक्तींचे एप्रिल व मे महिन्याचे अनुदान वाटप करण्यात आले आहे. १ हजार रुपये देण्याची शासनाने घोषणा केली आहे. त्याबाबत आदेश प्राप्त झाला नाही.
शिवकुमार स्वामी, निवासी उपजिल्हाधिकारी