कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतही खबरदारी घ्या : गुप्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:27 AM2021-07-25T04:27:03+5:302021-07-25T04:27:03+5:30
(फोटो : २४) अणदूर : कोविड महामारीमध्ये पहिल्या व दुसऱ्या लाटेमध्ये जिवाची बाजी लावून आशा कार्यकर्तींनी गावपातळीवर चांगले काम ...
(फोटो : २४)
अणदूर : कोविड महामारीमध्ये पहिल्या व दुसऱ्या लाटेमध्ये जिवाची बाजी लावून आशा कार्यकर्तींनी गावपातळीवर चांगले काम केले आहे. तिसऱ्या लाटेतदेखील सावधगीरी बाळगून एकही मृत्यू होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी केले.
तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील हॅलो मेडिकल फाउंडेशन संस्थेच्या अंतर्गत कोविड-१९ रिलीफ प्रकल्प व आरोग्य स्वराज्य प्रकल्पाच्या वतीने आशा कार्यकर्तींना औषध किट तसेच कोविड पश्चात गरजू रुग्णांना आर्थिक मदत वाटपाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हनुमंत वडगावे, तर प्रमुख पाहुणे म्हणून जि. प. सदस्य बाबूराव चव्हाण, महेंद्र धुरगुडे, प्रकाश चव्हाण, कुलस्वामिनी सूत गिरणीचे अध्यक्ष सुनील चव्हाण, सेवानिवृत्त पोलीस आयुक्त सुरेश कंदले, सेवानिवृत्त प्राध्यापक सुधाकर अहंकारी, सरपंच रामचंद्र आलुरे, जळकोटचे सरपंच अशोक पाटील, ग्रामविकास अधिकारी देवीदास चव्हाण, मधुकर बंदपट्टे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमात ७० गावांतील ९८ आशा कार्यकर्तींना प्रत्येकी पाच हजार रुपये किमतीची औषधे व सुरक्षा किटचे वाटप करण्यात आले. तसेच कोरोनाच्या काळात उपचार घेऊन दुरुस्त झालेल्या गरजू १२७ रुग्णांना प्रत्येकी पाच हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. सिप्ला फाउंडेशनच्या वतीने हॅलो मेडिकल फाउंडेशन संस्थेला तीन ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटर प्रदान करण्यात आले.
यावेळी डॉ. हनुमंत वडगावे, बाबूराव चव्हाण, महेंद्र धुरगुडे, प्रकाश चव्हाण, इंदुबाई कबाडे, राम लोंढे, ब्रह्मानंद पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक हॅलो फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. शशिकांत अहंकारी, सूत्रसंचलन बसवराज नरे यांनी केले. जानकी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभांगी अहंकारी यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी बालाजी जाधव, जावेद शेख, सतीश कदम, प्रबोध कांबळे, प्रसन्न कंदले, नागिणी सुरवसे, आशिष डावरे, गुलाब जाधव आदींनी पुढाकार घेतला.