ऑक्सिजन निर्मितीत भैरवनाथ कारखान्याचीही उडी; २४० सिलेंडर्स क्षमतेचा प्लांट कार्यान्वित होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 02:39 PM2021-05-11T14:39:11+5:302021-05-11T14:44:35+5:30
corona virus : तामलवाडीचा प्लांट वगळता उस्मानाबादला ऑक्सिजनसाठी अन्य जिल्हे व राज्यांवर अवलंबून रहावे लागत आहे.
उस्मानाबाद : जिल्ह्यात ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे निर्माण झालेले पेचप्रसंग व रुग्णांच्या उपचारावर झालेला विपरीत परिणाम लक्षात घेऊन साखर कारखान्यांनी ऑक्सिजन निर्मितीच्या क्षेत्रात पाऊल टाकले आहे. आता सोनारी येथील भैरवनाथ साखर कारखान्यानेही सवा कोटी रुपयांची गुंतवणूक करीत पुढील महिन्यापर्यंत प्लांट कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने व त्यातही ऑक्सिजनची गरज असलेल्या गंभीर रुग्णांची संख्या लक्षात घेता जिल्ह्यात ऑक्सिजनच्या तुटवड्याची चिन्हे निर्माण झाली होती. मात्र, ऑक्सिजन बेडची संख्याच मर्यादित असल्याने वेळ निभावून जात आहे. दरम्यान, प्रशासनाने तिसर्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन संपूर्ण जिल्हाभरात ऑक्सिजन बेडची संख्या वाढविण्यावर भर दिला आहे. यामुळे भविष्यात मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठाही आताच्या तुलनेत जास्तीचा लागणार आहे. तामलवाडीचा प्लांट वगळता उस्मानाबादला ऑक्सिजनसाठी अन्य जिल्हे व राज्यांवर अवलंबून रहावे लागत आहे. या इतर जिल्ह्यातून पुरवठा थांबल्यास उस्मानाबादची अडचण होईल. मात्र, या अडचणी भविष्यात उद्भवू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या हाकेस साखर कारखाने धावून येत आहेत. पहिल्यांदा धाराशिव कारखान्याने प्रकल्प उभारला. लवकरच येथून ऑक्सिजन मिळेल. यापाठोपाठ रांजणीच्या नॅचरल शुगर, पाडोळी येथील रुपामाता उद्योग समुहाने पुढाकार घेतला. आता सोनारी येथील भैरवनाथ साखर कारखान्यानेही पुढाकार घेऊन आ.तानाजी सावंत यांच्या सूचनेनुसार ऑक्सिजन प्लांटच्या उभारणीचे काम हाती घेतले आहे.
२४० सिलेंडर्सची क्षमता...
भैरवनाथ कारखान्याने सव्वा कोटी रुपयांची गुंतवणूक या प्रकल्पात केली आहे. नाशिक येथील कंपनीस प्लांटच्या उभारणीचे काम सोपविले असून, येथून दररोज २४० सिलेंडर्स ऑक्सिजनची निर्मिती होऊ शकेल. जून महिन्यात प्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे.