‘आधार’मुळे भीमरावला आई-वडील भेटले!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2020 05:41 AM2020-03-02T05:41:54+5:302020-03-02T05:42:02+5:30
आधार कार्ड काढण्यासाठी नेल्यानंतर त्याच्या कुटुंबासंदर्भातील माहिती समोर आली. त्यानंतर भीमरावला त्याच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.
पांडुरंग पोळे
नळदुर्ग (जि. उस्मानाबाद) : तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथील आपलं घर येथे अनाथ म्हणून दाखल झालेल्या भीमराव अन् त्याच्या आई-वडिलांची तब्बल चार वर्षानंतर भेट झाली. भीमरावचे मूळ गाव बीड जिल्ह्यातील छत्र बोरगाव हे आहे. आधार कार्ड काढण्यासाठी नेल्यानंतर त्याच्या कुटुंबासंदर्भातील माहिती समोर आली. त्यानंतर भीमरावला त्याच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.
साधारणपणे आठ-नऊ वर्षाचा एक अशक्त मुलगा पोलिसांना आॅक्टोबर २०१६ मध्ये परभणी जिल्ह्यातील मानवत रेल्वे स्टेशनवर आढळून आला होता. पोलिसांनी चौकशी केली असता, त्यास काहीही आठवत नव्हते. मुलाने दिलेल्या जुजबी माहितीवरून तो उस्मानाबाद जिल्ह्यातील असावा, असे समजून त्यास उस्मानाबादच्या बालकल्याण समितीकडे सोपविण्यात आले. परंतु, त्याच्या कुटुंबाची खात्री होईल, त्यामुळे बालकल्याण समितीने त्याला आपलं घरमध्ये दाखल केले. त्यास तिसरीत प्रवेश देण्यात आला. हनुमान घाडगे असे त्याचे नाव नोंदविण्यात आले. काही दिवसांपूर्वीच शालेय विभागाने सर्व विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढण्याचे आदेश दिले. तिसरीच्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे आधार कार्ड निघाले. परंतु, हनुमानचे आधार कार्ड निघत नव्हते. प्रत्येकवेळी काही ना काही त्रुटी निघत. ही बाब आपलं घरचे प्रभारी व्यवस्थापक नरेश ठाकूर
यांनी विश्वस्त पन्नालाल सुराणा
यांच्या निदर्शनास आणून दिली.
त्यावर हनुमान घाडगे यास सोबत
घेऊन हे तिघेही गुरूवारी ‘आधार’च्या मुंबई येथील क्षेत्रिय कार्यालयात
गेले.
आधार कार्यालयाच्या निदर्शनास हे आणून दिल्यानंतर त्यांनी कारणे शोधण्याचा प्रयत्न केला असता, त्याचे यापूर्वीच आधार कार्ड काढले असल्याने पुन्हा निघत नसल्याचे
स्पष्ट झाले. त्यानुसार हनुमान घाडगे
हा अनाथ नसून त्याचे नाव
भीमराव मच्छिंद्र शिंदे (रा. छत्र
बोरगाव, ता. माजलगाव) असल्याचे समोर आले होते.
>पेढे वाटून आनंदोत्सव साजरा
भीमराव शिंदे याचे आधी आधार कार्ड काढण्यात आले होते, असे लक्षात आले. त्यावरून त्याच्या नातेवाईकांचा शोध घेण्यात आला. खात्री पटल्यानंतर भीमरावला बीडच्या बालकल्याण समितीकडे सोपविण्यात आले. समितीने त्यास आई-वडिलांच्या स्वाधीन केले. चार वर्षानंतर आपला मुलगा भेटल्याने आई-वडील व नातेवाईकांसह मित्रमंडळींनी पेढे व साखर वाटून आनंदोत्सव साजरा केला.