सायकलनेच गाठले विवाहस्थळ, वधू-वरांना दिली सायकल भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 04:23 PM2020-02-15T16:23:35+5:302020-02-15T16:40:14+5:30
उस्मानाबादेत जिल्हाधिकाऱ्यांच्या संकल्पनेला प्रतिसाद
उस्मानाबाद : जिल्हाधिकाऱ्यांनी पर्यावरणसंवर्धनाच्या अनुषंगाने सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना शासकीय वाहनाऐवजी सायकलचा वापर करण्याचे निर्देश दिले आहेत़ त्यास चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे़ शुक्रवारी उस्मानाबादेतील एका अधिकाऱ्यास लग्नाची भेट म्हणून इतर अधिकाऱ्यांनी सायकलवरून विवाहस्थळ गाठत वधू-वरांनाही सायकल भेट दिली़
जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांना पर्यावरण संवर्धन व आरोग्यासाठी सायकलचा वापर करण्याचे निर्देश दिले आहेत़ इतकेच नव्हे तर त्या स्वत:ही नियमित सायकलनेच कार्यालय गाठत आहेत़ त्यांच्या निर्देशाला प्रतिसाद देत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने सायकलचा वापर सुरु केला आहे़ त्यापाठोपाठ आता पशुसंवर्धन विभागानेही सायकलचा वापर सुरु केला आहे़
या विभागातील पर्शसंवर्धन अधिकारी असलेल्या डॉ़ अभिजीत इंगळे यांचा शुक्रवारी उस्मानाबादेत विवाह सोहळा होता़ या विवाहाचे औचित्य साधत पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांनी नियोजित विवाहस्थळ सायकलवरुनच गाठले़ त्यानंतर पर्यावरण संवर्धन व आरोग्याचा संदेश देत या अधिकाऱ्यांनी नववधू-वरांना सायकलच भेट दिली़ त्यांनीही या भेटीचा स्विकार करीत यापुढे सायकलचा वापर करण्याचे वचन अन्य अधिकाऱ्यांना दिले़