तुळजाभवानी संस्थानचा मोठा निर्णय; मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात जाणाऱ्यांची होणार नोंद
By बाबुराव चव्हाण | Published: July 18, 2024 11:27 AM2024-07-18T11:27:54+5:302024-07-18T11:32:32+5:30
पाेलिसांच्या पत्रानंतर तुळजाभवानी मंदिर संस्थानकडून घेण्यात आला महत्वपूर्ण निर्णय
धाराशिव/तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवी मंदिरातील मुख्य गाभाऱ्यात प्रवेश करणाऱ्यांच्या नाेंदी ठेवण्याबाबतची सूचना एका पत्राद्वारे उपविभागीय पाेलीस अधिकाऱ्यांकडून करण्यात आली हाेती. यासाठी सुरक्षेचे कारण देण्यात आले आहे. याच पत्राचा संदर्भ देत मंदिर संस्थानकडून गुरूवारपासून मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यातील प्रवेशांच्या नाेंदी ठेवणे बंधनकारक केले आहे. तसे आदेशही काढले आहेत.
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तिपीठ असून दर्शनासाठी देशाच्या कानाकाेपऱ्यातून भाविक येतात. त्यामुळे वर्षातील बाराही महिने भाविकांची गर्दी असते. पुजाऱ्यांसह अनेक भाविक देवी मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात जावून दर्शन घेतात. आजवर गाभाऱ्यातील अशा प्रवेशांच्या नाेंदी ठेवल्या जात नव्हत्या. मात्र, उपविभागीय पाेलीस अधिकारी डाॅ. निलेश देशमुख यांनी मंदिर संस्थानला दिलेल्या पत्रानंतर आता या प्रक्रियेत गुरूवारपासून महत्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. सिंहासन पूजा आणि अभिषेक वेळ वगळता इतर वेळेत मंदिराच्या गाभाऱ्यात हाेणाऱ्या प्रवेशांच्या नाेंदी ठेवण्यात येणार आहेत. यासाठी चाेपदार दरवाजा येथे स्वतंत्र नाेंदवही असेल. या वहिमध्ये प्रक्षाळ व चरणतीर्थ पुजेवेळी गाभाऱ्यात जाणाऱ्यांची नाेंद केली जाणार आहे. मंदिर संस्थानचे तहसीलदार तथा व्यवस्थापक साेमनाथ माळी यांनी यासंदर्भातील पत्रक जारी केले आहे.
मनमानी प्रवेशाला बसेल आळा...
आजवर श्री तुळजाभवानी देवी मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात हाेणाऱ्या प्रवेशांची नाेंद घेतली जात नव्हती. मात्र, गुरूवारपासून नाेंद ठेवली जाणार असल्याने आता गाभाऱ्यात हाेणाऱ्या मनमानी प्रवेशाला आळा बसेल व प्रक्रियेत सुसूत्रता येईल, असा दावा मंदिर संस्थानच्या सूत्रांनी केला आहे.