उस्मानाबादमध्ये शिवसेनेला खिंडार; माजी खासदार रवींद्र गायकवाड शिंदे गटात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2022 06:58 PM2022-08-31T18:58:44+5:302022-08-31T18:58:58+5:30

माजी खा. रवींद्र गायकवाड यांनी मात्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत निष्ठेचा संदेश दिला होता.

Big loss to Shiv Sena in Osmanabad; Former MP Ravindra Gaikwad in the Eknath Shinde group | उस्मानाबादमध्ये शिवसेनेला खिंडार; माजी खासदार रवींद्र गायकवाड शिंदे गटात

उस्मानाबादमध्ये शिवसेनेला खिंडार; माजी खासदार रवींद्र गायकवाड शिंदे गटात

googlenewsNext

उस्मानाबाद : येथील माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांनी उद्धव ठाकरे गटाला जय महाराष्ट्र ठोकत शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्यांनी सोमवारी रात्री मुंबईत प्रवेश करीत उद्धव ठाकरे यांना धक्का दिला. 

शिवसेनेतील फुटाफुटीनंतर उमरगा मतदारसंघाचे आमदार ज्ञानराज चौगुले यांनी शिंदे गटाचा रस्ता धरला होता. त्यांचे राजकीय गुरू असलेल्या माजी खा. रवींद्र गायकवाड यांनी मात्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत निष्ठेचा संदेश दिला होता. मात्र, मागील काही दिवसांत त्यांची मनधरणी करण्यात त्यांचे शिष्य आ. चौगुले हे यशस्वी झाले अन् सोमवारी रात्री गायकवाड यांनी शिंदे गटाचा झेंडा हाती घेतला. यामुळे दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा मराठवाड्यातील एक कट्टर समर्थक ठाकरे गटाने गमावल्याची चर्चा होत आहे.

माजी खा. गायकवाड हे शिवसेनेत १९८८ पासून कार्यरत आहेत. विद्यापीठ नामांतराच्या वेळी त्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. यानंतर संघटनात्मक पदे भूषवितानाच १९९५ व २००४ साली उमरगा मतदारसंघातील मातब्बर काँग्रेसला शह देत विधानसभेवर निवडून गेले. २००९ साली लोकसभेसाठी ते सेनेचे उमेदवार होते. डॉ. पद्मसिंह पाटील यांच्याकडून अवघ्या ५ हजार मतांनी गायकवाड पराभूत झाले होते. त्यापुढील २०१४ च्या निवडणुकीत दोन लाखांहून अधिक मताधिक्य मिळूवन ते लोकसभेवर निवडून गेले.

या दोन घटनांनी प्रकाशझोतात...
खासदार असताना रवींद्र गायकवाड यांनी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात निकृष्ट भोजनाचा मुद्दा समोर करीत तेथील एका रोजेदार कर्मचाऱ्याच्या तोंडात भाकरी कोंबल्याचा आरोप झाला. यावरून मोठा गजहब झाला होता. त्यानंतर एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यास विमानातच चपलने मारहाण केल्याचा आरोप झाल्यानंतरही ते देशपातळीवर प्रकाशझोतात आले होते.

Web Title: Big loss to Shiv Sena in Osmanabad; Former MP Ravindra Gaikwad in the Eknath Shinde group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.