विद्यार्थ्यांना मोठा धक्का! उस्मानाबादच्या शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्रवेश थांबविले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2022 06:06 PM2022-11-01T18:06:14+5:302022-11-01T18:06:41+5:30
राज्यातील आयुर्वेदिक महाविद्यालयातील वैद्यकीय अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
उस्मानाबाद : येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया नाकारण्यात आली आहे. सुविधांच्या अभावामुळे भारतीय चिकित्सा पद्धती परिषदेने हे पाऊल उचलल्याने मोठा धक्का ठरला आहे. दरम्यान, सुविधांची पूर्तता करून प्रवेश प्रक्रिया पूर्ववत करण्याची मागणी सोमवारी आ.कैलास पाटील यांनी पत्राद्वारे केली आहे.
राज्यातील आयुर्वेदिक महाविद्यालयातील वैद्यकीय अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. दरम्यान, अपुरा कर्मचारी वर्ग, पायाभूत सुविधांची कमतरता आदी निकषांवरून राज्यातील पाच शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयांतील प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेची परवानगी नाकारल्याचे राष्ट्रीय भारतीय चिकित्सा पद्धती परिषदेने कळविले आहे. त्यात उस्मानाबादच्या महाविद्यालयाचाही समावेश आहे. कोरोनाच्या काळात आयुर्वेदिक महाविद्यालयाने उपचारात मोलाची कामगिरी बजावली आहे. येथे उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे.
उस्मानाबादच्या महाविद्यालयाची पदवी प्रवेश क्षमता ६३ असून, पदव्युत्तर प्रवेश क्षमता ४८, अशी एकूण १११ प्रवेश क्षमता आहे. सुविधांच्या कमतरतेमुळे यंदा प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया नाकारली असून, पदव्युत्तर प्रवेश क्षमता ४८ वरून २३ इतकी केली आहे. त्यामुळे येथील महाविद्यालयातील त्रुटींची पूर्तता करून प्रथम वर्षाची विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया पूर्ववत करावी, अशी मागणी आ. कैलास पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्याकडे सोमवारी पत्राद्वारे केली आहे.एकिकडे जिल्ह्यात यंदापासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया होत आहे, तर वर्षानुवर्षे सुरू असलेल्या शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयात प्रवेश नाकारण्यात आल्याने जिल्ह्यावर हा मोठा अन्याय ठरणार असल्याची भावना आ. पाटील यांनी व्यक्त केली.