उस्मानाबाद जिल्हा परिषदेत महाआघाडी देणार भाजपला टक्कर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2020 11:54 AM2020-01-08T11:54:24+5:302020-01-08T11:58:46+5:30

जि.प. अध्यक्ष व उपाध्यक्षांची बुधवारी होणार निवड

BJP collides in Osmanabad Zilla Parishad | उस्मानाबाद जिल्हा परिषदेत महाआघाडी देणार भाजपला टक्कर

उस्मानाबाद जिल्हा परिषदेत महाआघाडी देणार भाजपला टक्कर

googlenewsNext

उस्मानाबाद : जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीसाठी ऐन मोक्याच्या क्षणी महाविकास आघाडी स्थापन करण्याचा निर्णय झाला आहे़ ही आघाडी भाजपशी भिडणार असून, बुधवारी होणाऱ्या निवड प्रक्रियेत आघाडीच्या स्थापनेमुळे चुरस निर्माण झाली आहे़

उस्मानाबाद जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्षांची ८ जानेवारी निवड होणार आहे़ यापूर्वी भाजपच्या मदतीने राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत होती़ मात्र, विधानसभा निवडणुकीपूर्वी आ़राणाजगजितसिंह पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्याने राष्ट्रवादीचा एक मोठा सदस्य गट त्यांच्यासमवेत गेला आहे़ आजघडीला राष्ट्रवादीच्या २६ पैकी जवळपास १७ सदस्य त्यांच्यासोबत असल्याचे दिसते़ तर मूळ भाजपाचे जिल्हा परिषदेत केवळ ४ सदस्य आहेत़ याशिवाय, काँग्रेस व शिवसेनेतील काही सदस्यांना फोडून पुन्हा सत्तेत येण्यासाठी राणा पाटील समर्थक प्रयत्नशील आहेत़ दरम्यान, पाटील यांना रोखण्यासाठी काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सक्रीय झाले आहेत़ जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीचा प्रयोग करण्यासाठी हे पदाधिकारी प्रयत्नशील असून, मंगळवारी तिन्ही पक्षांच्या श्रेष्ठींनी सकारात्मकता दाखविल्यानंतर स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सोलापुरात बैठक घेऊन फॉर्म्युल्यावर चर्चा केली़ 

महाविकास आघाडीतील घटकपक्षांचे सर्वच सदस्य एकत्र राहिल्यास जिल्हा परिषदेत सत्तांतर शक्य आहे़ मात्र, ऐन मोक्याच्या क्षणी ही आघाडी स्थापन होत असल्याने संख्याबळासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही़ तरीही तिन्ही पक्षांचे पदाधिकारी आपले सदस्य महाविकास आघाडीच्याच बाजूने राहतील, असा विश्वास दर्शविल्याने त्यांना खांदेपालट होईल, अशी आशा आहे़ 

फाटाफूट होण्याची शक्यता  
महाविकास आघाडीच्या माध्यमातून भाजपसमोर आव्हान निर्माण करण्यात आले आहे़ असे असले तरी फाटाफूट होण्याची शक्यता अधिक असून, सत्तेत कोण जाणार? याविषयी नेमके चित्र स्पष्ट नाही़ त्यामुळे बुधवारी होणाऱ्या प्रत्यक्ष निवड प्रक्रियेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे़

Web Title: BJP collides in Osmanabad Zilla Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.