देवेंद्र फडणवीसांना CM करण्यासाठी भाजप आमदाराचे आई भवानीला साकडे; नवस फेडण्यासाठी निघाले चालत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 09:52 IST2025-01-02T09:41:42+5:302025-01-02T09:52:57+5:30
मुख्यमंत्री फडणवीसांसाठी देवीला साकडे घालणाऱ्या आमदार अभिमन्यू पवार यांची तुळजापूरची पायी वारी

देवेंद्र फडणवीसांना CM करण्यासाठी भाजप आमदाराचे आई भवानीला साकडे; नवस फेडण्यासाठी निघाले चालत
MLA Abhimanyu Pawar : विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या बहुमतानंतर देवेंद्र फडणवीस हे राज्याचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होताच भाजप आमदार, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालं होतं. लोकसभेतल्या पराभवानंतर देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत जोरदार मुसंडी मारली. देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांनी जोरदार प्रयत्न केले होते. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश आले. यामध्ये औसा मतदारसंघाचे भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांनीही देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यासाठी महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानीला नवस केला होता. आता देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यानंतर अभिमन्यू पवार हे नवस फेडण्यासाठी पायी तुळजापूरला निघाले आहेत.
देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, मी तुझ्या चरणी माथा टेकवण्यासाठी परत पायी चालत येईन, असा नवस आमदार अभिमन्यू पवार यांनी २०२१ साली केला होता. त्यानंतर देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. त्यामुळे आता अभिमन्यू पवार यांनी आई तुळजाभवानीच्या चरणी केलेला नवस पूर्ण करण्याचे ठरवलं आहे. आई जगदंबेच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी पदयात्रेच्या माध्यमातून औसा ते तुळजापूर पायी जात आहेत.
मराठवाड्याचा सर्वात महत्त्वाचा प्रोजेक्ट म्हणून मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाकडे पाहिले जाते. हा प्रकल्प पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असावेत, अशी माझी अपेक्षा होती. यामुळे आई तुळजाभवानीला मी नवस केला होता, असे अभिमन्यू पवार यांनी म्हटलं. औसा ते तुळजापूर हे जवळपास ५९ किमीचे अंतर अभिमन्यू पवार हे चालत पार करणार आहेत. १ जानेवारी पासून अभिमन्यू पवार यांनी तुळजापूर नवसपूर्तीची पदयात्रेला सुरुवात केली आहे. तर ३ जानेवारी ही पदयात्रा तुळजापूरात पोहोचणार आहे.
दरम्यान, अभिमन्यू पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात. स्वीय सहायक म्हणून काम करणाऱ्या अभिमन्यू यांना देवेंद्र फडणवीस यांनी औसाचे आमदार केले होते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत म्हणून त्यांनी साकडे घातले होते. मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर संपूर्ण पवार कुटुंबीयांनी आनंद व्यक्त केला.