APMC Election Result: धाराशिवमध्ये भाजप-सेनेचाच झेंडा; महाविकास आघाडीला एकच जागा
By बाबुराव चव्हाण | Published: April 29, 2023 02:58 PM2023-04-29T14:58:47+5:302023-04-29T14:59:09+5:30
धाराशिव कृषी उत्पन्न बाजार समितीवर यापूर्वी भाजपाचीच सत्ता हाेती. ही सत्ता काबीज करण्यासाठी महाविकास आघाडीकडून जाेरदार प्रयत्न करण्यात आले.
धाराशिव -धाराशिव कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक भाजप-शिवसेना महायुती व महाविकास आघाडीकडून प्रतिष्ठेची करण्यात आली हाेती. अखेर भाजपा आमदार राणाजगजितिसंह पाटील यांच्या नेतृत्वातील भाजप-शिवसेना शेतकरी विकास पॅनलने १८ पैकी १७ जागा जिंकत महाविकास आघाडीला जाेरदार धक्का दिला. व्यापारी मतदार संघातून महाविकास आघाडीची केवळ एक जागा निवडून आली आहे. निकाल घाेषीत हाेताच भाजपा-शिवसेना (शिंदे गट) पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत फटाके फाेडले. ‘राणा दादा तुम आगे बढाे, भारतीय जनता पार्टीचा विजय असाे’, अशा गगणभेदी घाेषणाही देण्यात आल्या.
धाराशिव कृषी उत्पन्न बाजार समितीवर यापूर्वी भाजपाचीच सत्ता हाेती. ही सत्ता काबीज करण्यासाठी महाविकास आघाडीकडून जाेरदार प्रयत्न करण्यात आले. शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार ओप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील यांच्यासह काॅंग्रेस तसेच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी प्रतिष्ठा पणाला लावली हाेती. तर दुसरीकडे भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील तसेच शिवसेना पदाधिकार्यांनी (शिंदे गट) सत्ता राखण्यासाठी जाेरदार फिल्डींग लावली हाेती. शेवटच्या क्षणापर्यंत दाेन्ही बाजुंनी प्रयत्नांची पराकाष्टा करण्यात आली. त्यामुळे शनिवारी मतमाेजणीला सुरूवात हाेण्यापूर्वीपर्यंत दाेन्ही बाजुंनी ‘‘आम्हीच जिंकणार’ असा दावा केला जात हाेता.
दरम्यान, सकाळी ९ वाजेच्या सुमारास प्रत्यक्ष मतमाेजणीला सुरूवात झाली असता, महाविकास आघाडीला दिलासा मिळेल असा, व्यापारी मतदारसंघातून निकाल आला. काॅंग्रेसचे उमेश राजेनिंबाळकर पाच मतांनी विजयी झाले. मात्र, दुसरीकडे शिवसेनेचे तालुकाप्रमुख सतीश साेमाणी यांचा दारून पाराभव झाला. यानंतर सेवा सहकारी संस्था (सर्वसाधारण), सेवा सहकारी संस्था (महिला), सेवा सहकारी संस्था (ओबीसी), सेवा सहकारी संस्था (भविजा), ग्रामपंचायत (सर्वसाधारण), ग्रामपंचायत (अनु. जाती व जमाती), ग्रामपंचायत (आर्थकदृष्ट्या दुर्बल) आणि हमाल मापाडी मतदार संघातून महायुवतीचे सर्व उमेदवार विजयी झाले. तर दुसरीकडे महाविकास आघाडीला भाेपळाही फाेडता आला नाही, हे विशेष. एकप्रकारे धाराशिव बाजार समितीत भाजपाने आपली सत्ता शाबूत ठेवत विराेधक असलेल्या शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी आणि काॅंग्रेस या तिन्ही पक्षांना जाेराचा धक्का दिला. सर्व निकाल हाती येताच जाेरदार जल्लाेष करण्यात आला.
हे आहेत विजय उमेदवार...
भाजप-शिवसेनेचे राजेंद्र बाळासाहेब पाटील, संजय परसराम वाघ, निहाल कलिमाेद्दीन काझी, प्रदीप नेताजीराव वीर, दत्तात्रय विनायकराव देशमुख, अमरसिंह रामराजे पडवळ, संताेष शहाजी पवार, मनिषा अरविंद पाटील, स्वाती अरूण काेळगे, गाेविंद ज्ञानाेबा लगडे, शेषेराव हिरामण चव्हाण, अनिल शहाजी भुतेकर, सुधीर बलभीम भाेसले, सुभाष महादेव पाटाेळे, मुराद न्हनु पठाण, विपीन त्रिंबक काकडे, साैदागर अर्जुन चव्हाण (सर्व उमेदवार महायुती) व महाविकास आघाडीचे उमेश राजेनिंबाळकर हे विजयी झाले आहेत.