भाजपाने महाविकास आघाडी नेत्यांच्या प्रतिमेला मारले जोडे
By बाबुराव चव्हाण | Published: October 21, 2023 03:16 PM2023-10-21T15:16:42+5:302023-10-21T15:16:59+5:30
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असतानाच कंत्राटी कर्मचारी भरतीचा शासन आदेश निघाला हाेता.
धाराशिव : कंत्राटी भरतीचा शासन आदेश महाविकास आघाडी सरकारच्याच काळात निघाला हाेता. या माध्यमातून सुशिक्षित बेराेजगार तरूणांच्या भवितव्याशी खेळण्याचे पाप ‘मविआ’च्या नेत्यांनीच केले, असा आराेप करीत शनिवारी धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चाैकात संबंधित नेत्यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जाेडे मारले. यानंतर त्यांच्या प्रतिमांचे दहन करून जाेरदार घाेषणाबाजी केली.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असतानाच कंत्राटी कर्मचारी भरतीचा शासन आदेश निघाला हाेता. यानंतर राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत आले. सुशिक्षित बेराेजगार तरूणांवर अन्याय करणारा ‘मविआ’ने काढलेला संबंधित शासन आदेश रद्द करण्याचे काम महायुती सरकारने केले. या माध्यमातून सुशिक्षित बेराेजगार तरूणांना दिलासा मिळाला आहे. मात्र, मविआचे नेते शरद पवार, माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, काॅंग्रेसचे नाना पटाेले ही मंडळी त्यांच्या सरकारचे पाप आमच्या महायुती सरकारच्या माथी मारण्याचे काम करीत आहे. हा प्रकार निषेधार्ह असल्याचे सांगत शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज चाैकात भाजपा जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य यांच्या नेतृत्वात ‘मविआ’ नेत्यांच्या प्रतिमेला जाेडे मारले. तसेच संबंधित प्रतिकात्मक प्रतिमांचे दहनही केले.
यावेळी जाेरदार घाेषणाबाजीही करण्यात आली. आंदाेलनात धाराशिव पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष अभय इंगळे, भाजयुमाेचे जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, अनिल काळे, इंद्रजीत देवकते, संदीप इंगळे, विकास कुलकर्णी, मकरंद पाटील, दत्ता सोनटक्के, प्रमोद पाटील, रमण जाधव, उदय देशमुख, वैभव हंचाटे, सिद्धूजीराजे निंबाळकर, पांडुरंग लाटे यांच्यासह कार्यकर्ते माेठ्या संख्येने सहभागी झाले हाेते.