Dharashiv: हत्येनंतर महिलेच्या मृतदेहासोबत २ दिवस झोपला, दुर्गंधीमुळे फरार; आरोपी ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 14:50 IST2025-04-01T14:44:58+5:302025-04-01T14:50:01+5:30
द्वारका नगरीतील मनीषा बिडवे-कारभारी हत्याकांडाचा उलगडा; ब्लॅकमेलिंग, छळाचा शेवट हत्येत, मुख्य आरोपीसह दोघे गजाआड

Dharashiv: हत्येनंतर महिलेच्या मृतदेहासोबत २ दिवस झोपला, दुर्गंधीमुळे फरार; आरोपी ताब्यात
कळंब : अखेर द्वारका नगरीतील मनीषा बिडवे-कारभारी हत्याकांडाचा छडा लागला असून, स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली आहे. रामेश्वर भोसले आणि उस्मान सय्यद या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुख्य आरोपी रामेश्वर भोसले यास पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनंतर येरमाळा येथे पकडण्यात आले.
45 वर्षीय मनीषा बिडवे-कारभारी हिचा मृतदेह 27 मार्च रोजी तिच्या राहत्या घरात सडलेल्या अवस्थेत आढळून आला होता. या घटनेमुळे अनेक तर्कवितर्क लावले गेले. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणाचा संतोष देशमुख प्रकरणाशी संबंध असल्याचा संशय व्यक्त केला होता. मात्र पोलिसांनी त्यात कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. पोलीस तपासानुसार, मनीषा बिडवे हिच्याकडे रामेश्वर भोसले हा काही महिन्यांपासून कामाला होता. सुरुवातीला तो तिचा ड्रायव्हर होता, पण त्यानंतर दोघांमध्ये शारीरिक संबंध निर्माण झाले. काही काळानंतर मनीषा त्याला नग्न फोटो आणि व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेल करू लागली. त्याला धमक्या देत शारीरिक आणि मानसिक छळ करत होती.
100 उठाबशांनंतर खून!
22 मार्च रोजी मनीषाने रामेश्वरला 100 उठाबशा काढायला लावल्या. या टॉर्चरला कंटाळून त्याने तिच्या डोक्यात घाव घातला, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. खून केल्यानंतर तो दोन दिवस मृतदेहासोबतच राहिला आणि तिथेच जेवत होता. मात्र दुर्गंधी सुटल्यावर तो पळून गेला. त्याने केजमधील मित्र उस्मान सय्यदला मृतदेह दाखवला आणि पुरावे नष्ट करण्याचा कट रचला.
मुख्य आरोपी अखेर जाळ्यात
पुराव्यांच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उस्मान सय्यदला तीन दिवसांपूर्वी अटक केली. त्याच्या चौकशीतून मिळालेल्या धाग्यांवरून मुख्य आरोपी रामेश्वर भोसलेला येरमाळा येथे सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, पोलीस हवालदार शौकत पठाण, प्रकाश औताडे, फरहानखान पठाण, जावेद काझी यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली. पुढील तपास सुरू असून आरोपींवर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.