लहुजी शक्ती सेनेचा तुळजापुरात रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:39 AM2021-09-10T04:39:45+5:302021-09-10T04:39:45+5:30
तुळजापूर : नांदेड जिल्ह्यातील गऊळ येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची विटंबना करून काढण्यात आलेला पुतळा येत्या ८ ...
तुळजापूर : नांदेड जिल्ह्यातील गऊळ येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची विटंबना करून काढण्यात आलेला पुतळा येत्या ८ दिवसांत सन्मानाने बसविण्यात यावा, यासह इतर मागण्यांसाठी लहुजी शक्ती सेनेच्या वतीने तुळजापूर येथील जुना बसस्थानक चौकात गुरुवारी तासभर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सरकार, पोलीस प्रशासनाचा निषेध नोंदवीत घोषणाबाजी करीत मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा बसस्थानक चौक येथे आल्यानंतर या ठिकाणी तासभर ठिय्या मांडण्यात आला. आंदोलनादरम्यान अन्याय-अत्याचाराविरोधात लहुजी शक्ती सेना, भीम-अण्णा सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भाषणातून रोष व्यक्त करण्यात आला.
रास्ता रोकोमुळे नळदुर्ग-लातूर-उस्मानाबाद रोडवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी नांदेड जिल्ह्यातील गऊळ या गावातील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची विटंबना करून काढण्यात आलेला पुतळा पुन्हा त्याच जागेवर बसवावा, तसेच या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या मातंग समाजाला अमानुष मारहाण केलेल्या पोलीस प्रशासनासह माजी जिल्हा परिषद सदस्य बाबूराव पाटील-गिरे यांच्यावर ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करून उपविभागीय पोलीस अधिकारी कांबळे यांना सेवेतून बडतर्फ करावे. सोलापूर जिल्ह्यातील बोरगाव येथे मातंग समाजाच्या मयत व्यक्तीची अंत्ययात्रा काढू न देणाऱ्यावर कठोर कारवाई करावी, उस्मानाबाद जिल्ह्यात ठिकठिकाणी झालेल्या मातंग समाजावरील अन्याय-अत्याचारामधील आरोपींवर कठोर कारवाई करून फाशीची शिक्षा द्यावी, या घटनेचा निषेध व्यक्त करीत असताना मातंग समाजाच्या नऊ व्यक्तींवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावे, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
आंदोलनात लहुजी शक्ती सेनेच्या प्रदेशाध्यक्ष नगिनाताई कांबळे, माजी पंचायत समिती सभापती शिवाजी गायकवाड, नगरसेवक किशोर साठे, भीम-अण्णा सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश भिसे, अशोक जाधव, लहुजी शक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी गायकवाड, उपाध्यक्ष विजय क्षीरसागर, तालुकाध्यक्ष कुंडलिक भोवाळ, लक्ष्मण क्षीरसागर, किसन देडे, अनिल देडे, विकास भिसे, लक्ष्मण गायकवाड, अविनाश कांबळे, सागर पारडेसह मातंग बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
चौकट......
भीम-अण्णा सामाजिक संघटनेचा पाठिंबा
आंदोलनास भीम-अण्णा सामाजिक संघटनेने पाठिंबा दर्शविला. यावेळी मोठा पोलीस फौज फाटा तैनात करण्यात आला होता. आंदोलनादरम्यान रस्त्याच्या कडेने बसलेल्या आंदोलकांतून दुचाकी गेल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान आंदोलनातील काही पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून तणाव आटोक्यात आणला. आंदोलनात महिला वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता.