नळदुर्ग किल्ल्यातील तलावात बोट उलटली; तीन मुलांचा बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 03:13 PM2019-04-20T15:13:29+5:302019-04-20T15:15:53+5:30
मृतांमध्ये एक मुलगा आणि दोन मुलींचा समावेश आहे.
नळदुर्ग (उस्मानाबाद ) : तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथील किल्ल्यात बोट उलटून झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. मृतांमध्ये एक मुलगा आणि दोन मुलींचा समावेश आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, शनिवारी सकाळी साधारपणे आठ ते साडेआठ वाजेच्या सुमारास जवळपास नऊ मुले-मुली किल्ला पाहण्यासाठी गेले होते. किल्ला पाहिल्यानंतर हे सर्वजण बोटींग करण्यासाठी गेले. नऊ मुले आणि एक मार्गदर्शक असे दहाजण बोटीमध्ये बसले. ही बोट पाण्यात काही अंतरावर गेली असता, एकजण बोटीच्या समोरच्या टोकाला धावत गेला. त्यामुळे बॅलन्स ढळल्याने बोट उलटली. हे सर्वजण बोटीखाली अडकल्याचे लक्षात येताच ‘युनिटी मल्टिकॉन्स’च्या बचाव पथकाने धाव घेतली.
पथकाने बोटीखाली अडकडलेले सायमा शफिक जागीरदार (१५), अफशा शफिक जागीरदार (१३), बुशेरा शफिक जागीरदार (१०), अनस नौशाद पटेल (१३, सर्व रा. मुंब्रा, मुंबई), अलीझा एहसान काझी (६) व एहसान नय्यर काझी (वय ३६, दोघे रा. नळदुर्ग) या सहा जणांना वाचविण्यात यश आले. तर सानिया फारूक काझी (८), अलमास शफिक जागीरदार (१०) आणि इझहान एहसान काझी (५ तिघे रा. नळदुर्ग) या तिघांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे नळदुर्ग शहरावर शोककळा पसरली आहे.