कोरोना वार्डातील स्वच्छतागृहात आढळला अस्थमा रुग्णाचा मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 06:25 PM2020-05-28T18:25:48+5:302020-05-28T18:27:33+5:30
या व्यक्तीमध्ये कोरोनासदृश्य लक्षणे आढळून येत असल्याने त्यांच्यावर कोरोना कक्षात उपचार सुरु करण्यात आले़ होते
उस्मानाबाद : शहरातीलच विकासनगर भागात राहणाऱ्या एका ४२ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह जिल्हा रुग्णालयातील कोरोना वार्डाच्या स्वच्छतागृहात आढळून आला आहे़ हा प्रकार गुरुवारी दुपारी उघडकीस आला असून, यामुळे रुग्णालयातच एकच खळबळ उडाली आहे़
उस्मानाबाद शहराच्या विकासनगर भागात राहणाऱ्या ४२ वर्षीय व्यक्तीस अस्वस्थ वाटू लागल्याने त्यास बुधवारी सकाळी ७़३० वाजता जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ दरम्यान, या व्यक्तीमध्ये कोरोनासदृश्य लक्षणे आढळून येत असल्याने त्यांच्यावर कोरोना कक्षात उपचार सुरु करण्यात आले़ बुधवारी रात्रीच या व्यक्तीचा स्वॅब घेण्यात आला़ यानंतर गुरुवारी सकाळी हा व्यक्ती वार्डातीलच स्वच्छतागृहात गेला होता़ बराच वेळ झाला तरी तो बाहेर आला नसल्याची बाब तेथे कर्तव्यावर असलेल्या एका नर्सच्या लक्षात आली़ तिने स्वच्छतागृह उघडण्याचा प्रयत्न केला, मात्र आतून कडी लावण्यात आली होती़ शिवाय, कसलाही प्रतिसाद मिळत नव्हता़ तेव्हा डॉक्टर व अन्य कर्मचाऱ्यांच्या लक्षात ही बाब आणून देण्यात आली़ कर्मचाऱ्यांनी स्वच्छतागृहाचा दरवाजा तोडला असता, आत तो व्यक्ती खाली पडला असल्याचे दिसून आले़ डॉक्टरांनी तपासणी केली असता, तो मृत झाल्याचे स्पष्ट झाले़ दरम्यान, या प्रकारामुळे जिल्हा रुग्णालयात खळबळ उडाली होती़
मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही
मयत झालेला व्यक्ती हा बुधवारी रात्री दाखल झाला होता़ त्याला अस्थम्याचा त्रास होता़ शिवाय, कोरोनासदृश्य लक्षणे असल्याने गुरुवारी सकाळी त्या व्यक्तीचा स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे़ मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही़ मयताचा कोरोना अहवाल आल्यानंतर ते स्पष्ट होऊ शकेल. -डॉ. सतिश आदटराव, वैद्यकीय अधिकारी, जिल्हा रुग्णालय