शौचालयाचा खड्डा खोदताना दोघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:21 AM2021-07-09T04:21:51+5:302021-07-09T04:21:51+5:30
माणकेश्वर (जि.उस्मानाबाद) : शौचालयाची पहिली टाकी भरल्याने दुसरा खड्डा तयार करताना लगतची टाकी फुटून त्यातील पाणी नव्या खड्ड्यात शिरल्याने ...
माणकेश्वर (जि.उस्मानाबाद) : शौचालयाची पहिली टाकी भरल्याने दुसरा खड्डा तयार करताना लगतची टाकी फुटून त्यातील पाणी नव्या खड्ड्यात शिरल्याने त्यात बुडून दोघांचा मृत्यू झाला आहे. ही घटना माणकेश्वर (जि.उस्मानाबाद) येथे गुरुवारी दुपारी घडली आहे.
भूम तालुक्यातील माणकेश्वर येथे ८ जुलै रोजी दुपारी संदीप भाऊ माळी यांच्या घरी शौचालयाचा शोषखड्डा खोदण्याचे काम सुरू होते. पूर्वीच्या शौचालयाचा शोषखड्डा पूर्णपणे भरून तो जाम झाल्याने लगतच नवीन खड्डा घेण्यात येत होता. हा नवीन खड्डा साधारणत: सात ते आठ फुटापर्यंत खोल गेलेला होता. उर्वरित काम करीत असतानाच शेजारील शौचालयाचा जुना खड्डा कोठे आहे, याचा अंदाज न आल्याने त्यास धक्का लागून तो फुटला. त्यामुळे जुन्या खड्ड्यातील घाण पाणी, माती हे नवीन खड्ड्यात वेगाने उतरले. यावेळी नवीन खड्ड्यात काम करीत असलेले मजूर रघुनाथ रनदिल हे पाण्यात पूर्णत: बुडाले. त्यांना कामात मदत करणारे संदीप बाळू माळी हे रघुनाथ रनदिल यांना वाचविण्यासाठी खड्ड्यात उतरले. मात्र, ते खड्ड्यात फसले. हे पाहून त्यांचे लहान भाऊ अमोल बाळू माळी हे मदतीसाठी खड्ड्यात उतरले. परंतु, खोलीचा अंदाज न आल्याने तेही पाण्यात बुडाले. या घटनेत रघुनाथ रनदिल व अमोल माळी यांचा बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती कळताच काही नागरिकांनी जेसीबीच्या मदतीने दोघांनाही बाहेर काढून रुग्णालयात नेले असता तेथे मृत घोषित करण्यात आले. मयत मजूर रघुनाथ रनदिल (५७) यांना तीन मुले व दोन मुली असा परिवार आहे. तर दुसरे मयत अमोल माळी (३१) यांना ३ वर्षांची मुलगी आहे. या घटनेने माणकेश्वर गावात हळहळ व्यक्त झाली.
वाचविण्यासाठी गेलेला एक जण वाचला...
मजूरकाम करीत असलेले रघुनाथ रनदिल हे पाण्याखाली गेल्याचे पाहून संदीप माळी हे खड्ड्यातील पाण्यात उतरले. मात्र, ते अर्ध्यातच फसल्याने डोके वर राहिले. मात्र, दुर्गंधीने ते बेशुद्ध पडले. हा प्रकार लक्षात येताच संदीप यांचे भाऊ अमोल माळी यांनी दोघांनाही वाचविण्यासाठी खड्ड्यात उडी घेतली. मात्र, लागलीच तेही या पाण्यात बुडून खाली गेले. ही घटना कळताच नागरिकांनी जेसीबी आणून सर्वांना बाहेर काढले. तेव्हा रघुनाथ व अमोल हे मृत झाले होते. तर संदीप हे काळी वेळाने शुद्धीवर आले.