१७ गावांच्या सीमा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:24 AM2021-04-29T04:24:14+5:302021-04-29T04:24:14+5:30

मुरूम : शहर व परिसरातील अनेक गावांत दुसऱ्या लाटेतील कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे उमरग्याचे उपविभागीय अधिकारी विठ्ठल ...

Boundaries of 17 villages closed | १७ गावांच्या सीमा बंद

१७ गावांच्या सीमा बंद

googlenewsNext

मुरूम : शहर व परिसरातील अनेक गावांत दुसऱ्या लाटेतील कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे उमरग्याचे उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले यांनी ज्या गावात पाचपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत, त्या गावांच्या सीमा सील करून अहवाल सादर करण्याचे आदेश पोलीस प्रशासनासह ग्रामपंचायतीला दिले होते. त्यानुसार, मुरूम पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या १७ गावांसह शहरातील चार गल्ल्याही प्रशासनाने सील केल्या आहेत.

उमरगा तालुक्यातील आलूर, आष्टाकासार, अचलेर, तुगाव, केसरजवळगा, बेळंब, सुंदरवाडी, काटेवाडी, भुसणी, कोथळी, येणेगूर, दाळिंब, महालिंगरायवाडी, कोराळ, सुपतगाव, काळनिंबाळा, दावलमलिकवाडी या १७ गावांत कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने पोलीस प्रशासन आणि ग्रामपंचायतीकडून रुग्ण आढळलेला भाग सील करून त्या भागात कंटेनमेंट झोन तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे या भागातील नागरिकांना आता अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडता येणार नाही. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आलूर, आष्टाकासार, येणेगूर या तिन्ही प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत आतापर्यंत शेकडो कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून, अनेकांनी आपला जीवदेखील गमावला आहे. केवळ आलूर आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या चार गावांत ३६ रुग्ण आढळले असून, यात उपचारानंतर बरे होऊन १२ रुग्ण घरी परतले आहेत. उर्वरित २४ रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत. आलूर, बेळंब, कदेर येथे प्रत्येकी ८ तर केसरजवळगा येथे सर्वाधिक १४ रुग्ण आतापर्यंत आढळून आले आहेत.

मुरूम शहरानेही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत १३० चा टप्पा पार केला असून, शहरात कोरोनाचे हॉटस्पॉट झालेले यशवंतनगर, संभाजीनगर, हनुमान चौक, सुभाष चौक या चार गल्ल्यादेखील पोलीस आणि पालिका प्रशासनाने सील केल्या आहेत. ज्या भागात रस्ता सील केला आहे, तेथे ग्रामीण भागात ग्रामसुरक्षा दलाचे जवान आणि होमगार्डसह पोलिसांचाही बंदोबस्त लावला आहे. नागरिकांनी शासनाचे नियम पाळून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मुरूम पोलीस ठाण्याचे सपोनि. यशवंत बारवकर, सपोनि रंगनाथ जगताप, पालिका मुख्याधिकारी हेमंत किरुळकर यांच्यासह संबंधित गावांचे सरपंच आणि ग्रामसेवकांनी केले आहे.

दीड हजारावर नागरिकांना लस

शासनाने ४५ वर्षापुढील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू केले आहे. त्यानुसार आलूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत आतापर्यंत १ हजार ७१७ जणांनी कोविड प्रतिबंधित लस घेतली आहे. यापैकी सर्वाधिक लसीकरण १ हजार २७ नागरिक आलूर येथील आहे. बेळंब येथे १७०, कदेर २९० तर केसरजवळगा येथे २३० जणांना ही लस देण्यात आली आहे.

चौकट........

वाशी तालुक्यातील पाच गावांत संचारबंदी

तेरखेडा : वाशी तालुक्यातील तेरखेडासह कडकनाथवाडी, मांडवा, पारगाव आणि कवडेवाडी या गावात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. त्यामुळे कळंब उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ यांनी या गावांमध्ये २८ एप्रिल ते ११ मे या कालावधीत या गावात संचारबंदी लागू केली आहे. प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले असले, तरी नागरिकांकडून त्याचे पालन होत नसल्याने रुग्णसंख्या वाढत आहे. याला प्रतिबंध घालण्यासाठी हे आदेश लागू करण्यात आले आहे. गटविकास अधिकाऱ्यांनी या गावांमध्ये कोरोनायोद्धा पथके स्थापन करून त्यांच्यामार्फत ग्रामस्थांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करावा, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे. शासन आदेशानुसार या गावात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने मात्र सुरू राहणार आहेत.

Web Title: Boundaries of 17 villages closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.