खंडोबा देवस्थान परिसरातील अतिक्रमणावर हाताेडा माराच; धाराशिव जिल्हा कचेरीसमाेर उपाेषण
By बाबुराव चव्हाण | Published: November 30, 2023 06:06 PM2023-11-30T18:06:44+5:302023-11-30T18:08:27+5:30
दहीफळ-खंडोबा देवस्थान परिसरातील अतिक्रमणे ठरताहेत अडचणीची
धाराशिव : कळंब तालुक्यातील दहीफळ येथील ग्रामदैवत श्री क्षेत्र खंडोबा मंदिर परिसरात अतिक्रमण करण्यात आले आहे. त्यामुळे यात्रा व धार्मिक कार्यक्रमाला अडचण येते. हे अतिक्रमण तत्काळ काढण्यात यावे, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि. ३० नोव्हेंबरपासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.
कळंब तालुक्यातील दहिफळ येथील श्री क्षेत्र खंडोबा देवस्थानाला ‘क’ देवस्थान तीर्थक्षेत्राचा दर्जा असून, देवस्थानच्या विकास कामांसाठी निधी मंजूर झालेला आहे. परंतु मंदिर परिसरात अतिक्रमणामुळे अडचण निर्माण झाली आहे. खंडोबा देवस्थान चंपाषष्टीला सटीची यात्रा भरते. यात्रेनिमित्त दर्शनासाठी हजारो भाविक दाखल होतात. मागील वर्षी या यात्रेतील धार्मिक कार्यक्रमात भाविकांची गर्दी झाली होती. यावेळी भाविकाच्या झालेल्या मृत्यूला अतिक्रमणच कारणीभूत ठरले हाेते. तरीही प्रशासनाने उपाययाेजना केल्या नाहीत.
वारंवार लेखी व तोंडी मागणी करूनही अतिक्रमण ‘जैसे थे’ असल्याचे उपाेषणकर्त्यांचे म्हणणे आहे. आंदोलनामध्ये जयवंत भातलवंडे, पांडुरंग भातलवंडे, सज्जन कोठावळे, तुकाराम भातलवंडे, नारायण ढवळे, अविनाश पांचाळ, भारत खंडागळे, पांडुरंग खंडागळे, बालाजी भातलवंडे, संदीप सकुंडे, राजकुमार भातलवंडे, स्वराज मते, सत्यवान भातलवंडे, अजित मते, संतोष भातलवंडे, वसंत भातलवंडे, स्वराज मते व दत्तात्रय मते आदी सहभागी झाले आहेत.