सावरगावच्या तरुणांचा ब्रोकोलीचा प्रयोग यशस्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:32 AM2021-03-16T04:32:16+5:302021-03-16T04:32:16+5:30
पाथरुड (जि. उस्मानाबाद) : शेती नफ्यात आणायची तर नवे प्रयोग, पीकपद्धतीतील बदल हे आवश्यक ठरले आहेत. याच नवप्रयोगांची गरज ...
पाथरुड (जि. उस्मानाबाद) : शेती नफ्यात आणायची तर नवे प्रयोग, पीकपद्धतीतील बदल हे आवश्यक ठरले आहेत. याच नवप्रयोगांची गरज ओळखून भूम तालुक्यातील सावरगाव (पा.) येथील योगेश शिंदे व गणेश महानवर या दोन तरुणांनी आपल्या प्रत्येकी २० गुंठे क्षेत्रावर ब्रोकोली या भाजीवर्गीय पिकाची लागवड करून ते यशस्वी करून दाखविले आहे.
सावरगाव (पा.) येथील योगेश शिंदे हे काहीकाळ पुणे येथे नोकरीनिमित्त होते. तेव्हा त्यांना शहरात मोठ्या प्रमाणात मागणी असलेली ब्रोकोलीची भाजी माहीत झाली. त्यानंतर ते लाॅकडाऊन झाल्याने शहरातून गावी सावरगावात आले व त्यांनी आपल्या शेतात ब्रोकोलीचे पीक घेण्याचे ठरवले. यासाठी त्यांना गणेश महानवर या तरुणाचीही साथ मिळाली. मात्र, ब्रोकोली भाजीवर्गीय पीक गावात तर सोडाच संपूर्ण तालुक्यातही नसलेले व अनेकांना माहितीही नसलेले हे पीक आपल्या भागात येईल का, ही भीती होतीच. तरीही या तरुणांनी धाडस दाखवत हे पीक घेण्याचे ठरवले आणि बियाणे आणून रोपे तयार केली. दोघांनी प्रत्येकी २० गुंठे क्षेत्रावर रोपांची ठिंबक सिंचनवर लागवड केली. कीड रोगाच्या नियंत्रणासाठी कीटकनाशकांची फवारणी करीत लागवडीपासून काढणीपर्यंत जवळपास दहा ते पंधरा हजार खर्च करीत फुलकोबीसदृश्य ब्रोकोलीचे पीक यशस्वीरीत्या उत्पादित केले आहे. २० गुंठे क्षेत्रातून सुमारे दीड टन ब्रोकोलीचे उत्पादन निघण्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. चांगला दर मिळाल्यास लाखभराचे उत्पन्न मिळू शकते, असे ते म्हणाले. दरम्यान, या पिकास शहरात तेही खासकरून हॉटेलमध्ये मोठी मागणी असल्याचेही त्यांनी सांगितले.
२० गुंठे क्षेत्रावर लागवड केलेल्या ब्रोकोलीचे जवळपास अडीच टन उत्पादन निघण्याचा अंदाज आहे. मात्र, सध्या कोरोनाने बाजारात अस्थिरतेचे वातावरण असल्याने भाव मोठ्या प्रमाणात कमी झाले आहेत - गणेश महानवर, सावरगाव
परिसरात नव्हे तर तालुक्यात कोठेच ब्रोकोली पीक नसल्याने हे पीक येईल का, अशी शंका होती. मात्र, योग्य नियोजन व कृषीविभागाचे मार्गदर्शन यामुळे आम्ही हे ब्रोकोलीचे पीक यशस्वीरीत्या आणले आहे. -योगेश शिंदे, सावरगाव
सावरगाव येथील योगेश शिंदे व गणेश महानवर यांनी भूम तालुक्यात कुठेच नसलेले; परंतु शहरात चांगली मागणी असलेले ब्रोकोलीचे भाजीवर्गीय पीक यशस्वीरीत्या उत्पादित केले आहे. - गणेश चव्हाण, कृषी सहाय्यक
150321\15osm_2_15032021_41.jpg~150321\15osm_3_15032021_41.jpg
सावरगाव येथे ब्रोकोली या भाजीवर्गीय पिकाचे दोन तरुणांनी यशस्वीरित्या उत्पादन घेतले.~सावरगाव येथे ब्रोकोली या भाजीवर्गीय पिकाचे दोन तरुणांनी यशस्वीरित्या उत्पादन घेतले.