सोडवायला गेले भावकीचे भांडण, मारहाणीत मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:39 AM2021-09-09T04:39:49+5:302021-09-09T04:39:49+5:30
लोहारा तालुक्यातील रुद्रवाडी येथे बुधवारी शिवाजी चंद्रकांत शिंदे (३४) याने पहाटे अडीच वाजता आपल्या कुटुंबातील वादावादीनंतर कुटुंबातील सदस्यांना काठीने ...
लोहारा तालुक्यातील रुद्रवाडी येथे बुधवारी शिवाजी चंद्रकांत शिंदे (३४) याने पहाटे अडीच वाजता आपल्या कुटुंबातील वादावादीनंतर कुटुंबातील सदस्यांना काठीने जबर मारहाणीस सुरुवात केली. यावेळी झालेल्या आरडाओरडीनंतर शेजारील भावकीतील गुलचंद हरिबा शिंदे (६०) हे भांडण सोडवायला गेले होते. तेव्हा आरोपी शिवाजी शिंदे याने त्यांनाही काठीने डोक्यात मारहाण करून गंभीर जखमी केले. यानंतरही आरोपीने आपली पत्नी सरोजा शिवाजी शिंदे (३०), आई जिजाबाई चंद्रकांत शिंदे (५५), मुलगी कावेरी शिवाजी शिंदे (५), मुलगा संतोष शिवाजी शिंदे (४) व मुलगी कविता शिवाजी शिंदे (३) यांना मारहाण करीत गंभीर जखमी केले. घराबाहेर आल्यानंतर आरोपीने शेजारील बब्रुवान रंगा हराळे यांनाही डोक्यात काठी मारून जखमी केले. तेव्हा नागरिकांनी एकत्र येऊन आरोपीला पकडून घरात कोंडले व तातडीने सर्व जखमींना उपचारांसाठी उमरगा येथे पाठविले. यातील बहुतांश जखमींची प्रकृती बनल्याने तेथून त्यांना पुढील उपचारांसाठी सोलापूरला पाठवले आहे. तर जखमी गुलचंद हरिबा शिंदे यांचा सोलापूरकडे नेत असताना रस्त्यात मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच लोहारा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक सुनीलकुमार काकडे, जी.बी. इंगळे, डी.जी. पठाण आदी घटनास्थळी दाखल झाले व आरोपीला ताब्यात घेतले. मयताचा भाऊ भालचंद्र शिंदे यांच्या फिर्यादीवरून लोहारा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी फॉरेन्सिक टीमला पाचारण केले असून, उपविभागीय अधिकारी अनुराधा उदमले यांनीही भेट देऊन पाहणी केली आहे. तपास पोलीस निरीक्षक सुनीलकुमार काकडे करीत आहेत.