आर्थिक आमिष दाखवून ‘बुद्धिवाना’ची केली ठगाने फसवणूक
By चेतनकुमार धनुरे | Updated: September 26, 2023 19:14 IST2023-09-26T19:14:06+5:302023-09-26T19:14:25+5:30
परंडा पोलिसांत अज्ञात ठगाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आर्थिक आमिष दाखवून ‘बुद्धिवाना’ची केली ठगाने फसवणूक
धाराशिव : आर्थिक फायद्याचे आमिष दाखवत क्रेडिट कार्डाची माहिती काढून घेत, एका ठगाने तरुणाला सवा लाखाला गंडविल्याची घटना परंडा तालुक्यात उघडकीस आली आहे. परंडा पोलिसांनी सोमवारी याबाबत गुन्हा दाखल करून घेतला आहे.
परंडा तालुक्यातील टाकळी येथील रहिवासी असलेल्या बुद्धिवान परमेश्वर काळे या तरुणास काही दिवसांपूर्वी मोबाइलवर एका ठगाने संपर्क साधला. आर्थिक फायद्याचे आमिष दाखवून त्याने बुद्धिवानकडून त्याच्या क्रेडिट कार्डची माहिती काढून घेतली. यानंतर लागलीच या कार्डद्वारे ४ हजार ५०० रुपये काढून घेतले. नंतर कार्डवरून १ लाख १९ हजार रुपयांचे कर्ज त्या ठगाने उचलल्याचे लक्षात आले.
आपली फसवणूक झाल्याचे समजल्यानंतर, बुद्धिवान काळे याने परंडा पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार, सोमवारी अज्ञात ठगाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.