ढोकीत घरफोडी, साडेतीन लाख लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:22 AM2021-06-11T04:22:57+5:302021-06-11T04:22:57+5:30
ढोकी : उस्मानाबाद तालुक्यातील ढोकी येथे अज्ञात चोरट्यांनी दोन घरात घुसून कपाटातील दागिने व रोकड असा साडेतीन लाख रुपयांचा ...
ढोकी : उस्मानाबाद तालुक्यातील ढोकी येथे अज्ञात चोरट्यांनी दोन घरात घुसून कपाटातील दागिने व रोकड असा साडेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केली. ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली आहे.
ढोकी येथील बालाजी रघुनाथ सुरवसे यांच्या घरात गुरुवारी पहाटे एक ते पाच वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी चॅनल गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. यानंतर कपाटातील एक लाखाची रोकड, सहा ग्रॅमचे सोन्याचे झुमके, पाच ग्रॅम सोन्याचा सेवनपीस, साडेसात ग्रॅमचे मनी, बारा ग्रॅमचे मंगळसूत्र, दोन ग्रॅमची नथ, दोन ग्रॅमचे रिंग, पाच ग्रॅमची अंगठी, चांदीचे नाणे, पंधरा हजार रुपये किमतीचे घड्याळ, असा बालाजी सुरवसे यांचा २ लाख २३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. दरम्यान, शेजारच्याच गल्लीतील व्यंकट महादेव क्षीरसागर यांच्याही घरी पहाटेच्या सुमारास चोरी झाली. त्यांच्या घरातून चोरट्यांनी २४ हजार रोख, दोन तोळ्याचे गंठण, पाच ग्रॅमची अंगठी, लहान मुलाच्या दोन अंगठ्या, पाच ग्रॅमचे झुमके, दोन चांदीच्या मूर्ती, असा एकूण १ लाख २६ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर ढोकी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. तसेच श्वान पथक, फिंगरप्रिंट पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
याप्रकरणी बालाजी सुरवसे व व्यंकट क्षीरसागर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ढोकी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास पोलीस उपनिरीक्षक सातपुते हे करीत आहेत.