बस चालकाच्या मुलाने सर केलं ‘UPSC’ चे शिखर; शशिकांत नरवडेने मिळवली ४९३ वी रँक
By बाबुराव चव्हाण | Published: May 24, 2023 06:55 PM2023-05-24T18:55:51+5:302023-05-24T18:57:12+5:30
पाच वेळा अपयश तरी सोडली नाही जिद्द
तुळजापूर : पाच वेळा अपयश तरी जिद्द व चिकाटीच्या जोरावर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत तुळजापूर तालुक्यातील मसला (खु.) येथील शशिकांत दत्तात्रय नरवडे याने देशात ४९३ वी रँक मिळवून ‘लहरों से डरकर नौका पार नही होती, कोशीश करने वालों की कभी हार नही होती’, या कवितेच्या ओळी खऱ्या करून दाखविल्या आहेत. वडील सेवानिवृत्त बसचालक व डॉक्टर भाऊ यांनी दिलेल्या बळावर जिद्दीने शशिकांतने यश संपादन केले आहे.
शशिकांत यांचे १ ली ते ४ थी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण हे गावातील जिल्हा परिषद शाळेत झाले आहे. तर पाचवी ते दहावी पर्यंतचे शिक्षण वैराग येथील तुळशीदास जाधव प्रशालेत झाले. दहावीत १०० टक्के गुण प्राप्त केले होते. यानंतर शशिकांतने महाविद्यालयीन शिक्षण लातूर येथील शाहू कॉलेजमधून झाले. कुटुंबाची हलाखीची परिस्थिती असल्याने बॅंकेकडून अडीच लाखांचे कर्ज घेऊन ‘बी-टेक’ पूर्ण केले. यानंतर २०१७-२०२० या कालावधीत पुणे येथे राहून स्पर्धा परीक्षेची तयारी केली. २०१७ मध्ये पहिल्यांदा परीक्षा दिली. परंतु, अपेक्षित यश मिळाले नाही. २०२०-२०२१ मध्ये ‘सारथी’च्या स्कॉलरशीपच्या सहाय्याने दिल्ली येथे राहून वर्षभर अभ्यास केला.
मात्र, यानंतर आर्थिक चणचण अधिक तीव्र झाली. त्यामुळे पुन्हा पुणे गाठले. येथे खाजगी क्लासेसमध्ये ‘लेक्चर’ म्हणून काम सुरू केले. यातून मिळणार्या पैशातून अभ्यास सुरू ठेवला. तीनवेळा मुख्य परीक्षेपर्यंत मजल मारली. परंतु, यश काही हाती लागले नाही. पाचव्या प्रयत्नात तर अवघ्या एका गुणाने यशाने हुलकावणी दिली. मात्र, यानंतरही त्यांनी जिद्द साेडली नाही. उलट अभ्यास वाढवला. सलग पंधरा तास अभ्यास करून सहाव्या प्रयत्नात ‘युपीएससी’चे शिखर सर केले. शशिकांत यांचे हे प्रयत्न, चिकाटी अन् जिद्द स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असलेल्या इतर विद्यार्थ्यांत उत्साह भरणारी ठरेल.
संकटाशी दाेन हात केले अन....
शशिकांत यांचे वडील दत्तात्रय नरवडे यांनी १२ वी पर्यतचे शिक्षण पूर्ण करून राज्य परिवहन महामंडळाच्या बार्शी आगारात बस चालक नाेकरी केली. ते २०१८ मध्ये सेवानिवृत्त झाले. तर आई सुनंदा नरवडे यांचे नववी पर्यंच शिक्षण झाले आहे. त्या गृहिणी आहेत. अशा प्रतिकुल परिस्थितीचा सामना करीत शशिकांत यांचा माेठा भाऊ श्रीराम नरवडे यांनी ‘एमबीबीएस’, ‘एमडी’ पूर्ण केले. सध्या ते तुळजापूर उपजिल्हा रूग्णालयात कार्यरत आहेत. भावाच्या पावलावर पााऊल ठेवत संकटाचा सामना करीत शशिकांत यांनीही ‘युपीएससी’चे शिखर सर केले.