मार्चअखेर एसटीच्या 200 बस धावणार बॅटरीवर, १७२ बसस्थानकांत चार्जिंग स्टेशन उभारणीचे काम अंतिम टप्प्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2024 13:24 IST2024-03-05T13:22:11+5:302024-03-05T13:24:04+5:30
तांत्रिक अडचणी दूर करून मार्चअखेर पहिल्या टप्प्यात २०० इलेक्ट्रिक बस एसटीच्या ताफ्यात धावणार आहेत. त्यामुळे लवकरच सर्वसामान्य जनतेचे प्रदूषणमुक्त वातानुकूलित प्रवासाचे स्वप्न सत्यात उतरणार आहे.

मार्चअखेर एसटीच्या 200 बस धावणार बॅटरीवर, १७२ बसस्थानकांत चार्जिंग स्टेशन उभारणीचे काम अंतिम टप्प्यात
धाराशिव : राज्यातील १७२ बसस्थानकांत इलेक्ट्रिक बससाठी चार्जिंग स्टेशन निर्माण केली जाणार आहेत. या कामाचे कार्यारंभ आदेश निघाले असून, युद्धपातळीवर चार्जिंग स्टेशन उभारली जात आहेत. तांत्रिक अडचणी दूर करून मार्चअखेर पहिल्या टप्प्यात २०० इलेक्ट्रिक बस एसटीच्या ताफ्यात धावणार आहेत. त्यामुळे लवकरच सर्वसामान्य जनतेचे प्रदूषणमुक्त वातानुकूलित प्रवासाचे स्वप्न सत्यात उतरणार आहे.
प्रदूषण रोखणार, बचत होईल
nवातावरणातील प्रदूषण रोखण्यासाठी तसेच इंधनावरचा खर्च कमी करण्यासाठी महामंडळाने इलेक्ट्रिक बसेस आपल्या ताफ्यात आणण्याचा निर्णय घेतला आहे.
nत्यानुसार राज्यात एकूण ५ हजार १५० बस धावणार आहेत. पहिल्या टप्प्यात २०० बस मार्चअखेरपर्यंत विविध जिल्ह्यांतून धावायला सुरुवात होईल. यासाठी १७२ बसस्थानकांमध्ये चार्जिंग स्टेशनच्या कामाचे कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत.
nचार्जिंग स्टेशनसाठी एसटी महामंडळाला स्पेशल सप्लाय घ्यावा लागणार आहे. यासाठी महावितरणकडे प्रतिसप्लाय २५ लाख रुपयांची सुरक्षा अनामत ठेवावी लागणार आहे.
२०० इलेक्ट्रिक बस
राज्यातील १७२ चार्जिंग स्टेशनच्या कामाला वर्कऑर्डर देण्यात आली आहे. मार्चअखेरपर्यंत ५ हजार १५० पैकी पहिल्या टप्प्यात २०० इलेक्ट्रिक बस सुरू करण्यात येणार आहेत. याबाबत संबंधितांना सूचना दिल्या आहेत.
- अभिजित भोसले, जनसंपर्क अधिकारी, राज्य परिवहन महामंडळ
बसच्या चार्जिंगसाठी लागणार तीन तास...
एक बस पूर्ण चार्ज होण्यासाठी किमान तीन तासांचा अवधी लागेल. कमी दाबाने वीजपुरवठा हाेत असल्यास हा कालावधी आणखी वाढू शकताे. अशा ठिकाणी महावितरणकडून स्वतंत्र ट्रान्स्फाॅर्मर दिला जाणार आहे. इलेक्ट्रिक बस एकदा चार्जिंग केल्यास किमान तीनशे किलाेमीटर धावेल. डिझेलच्या तुलनेत विजेवर हाेणारा खर्च कमी असेल. एवढेच नाही तर सर्व्हिसिंगचा खर्चही बऱ्यापैकी कमी असेल.