बायपास बनतोय ‘अपघाती मार्ग’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:31 AM2021-03-16T04:31:59+5:302021-03-16T04:31:59+5:30
(फोटो : १४ अजित) तुळजापूर : शहरातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी व वाहन चालकांची गैरसोय टाळण्यासाठी शहरानजीक उस्मानाबाद-लातूर - सोलापूर ...
(फोटो : १४ अजित)
तुळजापूर : शहरातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी व वाहन चालकांची गैरसोय टाळण्यासाठी शहरानजीक उस्मानाबाद-लातूर - सोलापूर या बायपास मार्गाचे काम हाती घेण्यात आले. परंतु, मागील वर्षभरापासून हे काम अर्धवट अवस्थेत रखडल्यामुळे अपघात वाढले असून, या मार्गाची ओळखच आता ‘अपघाती मार्ग’ अशी होऊ लागली आहे.
तुळजापूरनजीकच्या उस्मानाबाद - लातूर - सोलापूर या बायपास महामार्गावर तडवळा गावानजीक व सोलापूरकडे जाणाऱ्या मार्गावर वर्षभरापासून हे काम अर्धवट अवस्थेत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे तडवळानजीक देशमाने यांच्या शेतीजवळ रखडलेल्या रस्त्यामुळे वर्षभरात तब्बल १० ते १५ अपघात घडले असून, यामध्ये काहींना कायम अपंगत्व आले आहे. अन्य किरकोळ जखमी झाले असून, या अपघातात चारचाकी गाड्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. तसेच या बायपास मार्गावर लातूर रस्त्यावर चौक तयार झाला आहे. हा चौक लहान असल्याने वाहने वळवताना, समोरा-समोर वाहनांचा अपघात घडत आहेत. चार पदरी रस्ता असल्याने वाहने सुसाट असतात. मात्र, रस्त्यावर पुढे चौक असल्याबाबतचा सूचना फलक लावण्याची तसदीही घेण्यात आलेली नाही. शिवाय, चार बाजूने येणाऱ्या रस्त्यावर गतिरोधकाचाही पत्ता नाही. त्यामुळे भरधाव वेगात आलेल्या वाहनांचे अपघात घडून वर्षभरात जवळपास ५ जणांना प्राण गमवावे लागले. बायपास मार्गावर माळी यांच्या शेताजवळील काम अर्धवट असून, नळदुर्गकडे जाण्यासाठी सोडण्यात आलेल्या सर्व्हीस रस्त्याचे कामही करण्यात आलेले नाही. त्यामुळे वाहनधारकांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे प्रशासन व लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन हे काम तत्काळ मार्गी लावावे, अशी मागणी वाहनधारकांमधून केली जात आहे.
सिमेंट रस्त्याला गेले तडे !
बायपास रस्त्याची कामे करत असताना संबंधित ठेकेदाराकडून शासनाचे नियम व अटी चक्क धाब्यावर बसवत हे काम निकृष्ट दर्जाचे केले. यामुळे सद्यस्थितीत सिमेंट रस्त्यावर ठिकठिकाणी तडे जाऊन रस्ता उखडत असल्याचे दिसत आहे. शिवाय, अर्धवट कामे पूर्ण करण्याऐवजी टोलची वसुली सुरू करण्यात आल्याने वाहनधारकांत संताप व्यक्त होत आहे.
गतिरोधकाची गरज
बायपास चौकात आल्यानंतर चारही बाजूच्या वाहनांच्या वेगावर नियंत्रण राखण्यासाठी गतिरोधक टाकणे आवश्यक आहे. मात्र, येथे संबंधित ठेकेदाराने गतिरोधक टाकले नसल्यामुळे येथे अपघात घडून जवळपास पाच ते सहा जणांना जीव गमवावा लागला आहे. तसेच अनेक वाहनांच्या चुराडा झाला आहे. सध्या किरकोळ अपघात वारंवार घडत आहेत. या चौकात विजेची सोय नाही. काम अर्धवट असल्यामुळे ठेकेदाराने सूचना फलक लावून वाहनधारकांना याची कल्पना देणे गरजेचे आहे. परंतु, या मार्गावर कुठेही असे फलक दिसून येत नाहीत. त्यामुळे वाहने सुसाट धावतात. तसेच उड्डाण पुलावरील विद्युत दिवेही बंद राहात असल्यामुळे उभारलेले खांब केवळ शोभेच्या वस्तू ठरत आहेत.