प्राथमिक आरोग्य केंद्रातही होणार ‘कॅन्सर’ची तपासणी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2019 07:19 PM2019-12-18T19:19:44+5:302019-12-18T19:20:38+5:30
तपासणीसाठी स्वतंत्र किटही उपलब्ध करून देणार
- बाबूराव चव्हाण
उस्मानाबाद : शहरी तसेच ग्रामीण भागातही कॅन्सरग्रस्त रूग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. कॅन्सरचे वेळीच निदान होत नाही. त्यामुळे उपचारास विलंब होतो. यातूनच रूग्ण दगावण्याचे प्रमाणही चिंताजनक आहे. ही बाब लक्षात घेता, शासनाने जिल्हा परिषदेच्या माध्यमातून चालविण्यात येणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणीच तीन प्रकारच्या कॅन्सरची प्राथमिक चाचणी करण्याचे निर्देश दिले आहे. त्यानुसार आरोग्य विभागाने लातूर येथील कॅन्सर हॉस्पिटलमध्ये प्रत्येक आरोग्य केंद्रातील एक या प्रमाणे ४० ते ४२ आरोग्य सेविकांना कॅन्सर चाचणीचे प्रशिक्षण दिले आहे. नव्या वर्षापासून प्रत्यक्ष चाचणीला सुरूवात होईल.
जिल्ह्यात मागील काही वर्षांत कॅन्सरच्या रूग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होवू लागली आहे. त्यास वेगवेगळी कारणे असली तरी प्रामुख्याने झपाट्याने बदलत चाललेली जीवनशैली, तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन आदींचा उल्लेख येतो. दरम्यान, शासनाच्या आरोग्य खात्याकडून कॅन्सरची तपासणी करून घेण्याचे आवाहन वेळोवेळी केले जाते. त्यावर लाखोंचा खर्च होतो. अनेकवेळा डॉक्टरांना शंका आल्यानंतर संबंधित रूग्णास कॅन्सरची तपासणी करून घेण्याचा सल्ला दिला जातो. अशावेळी रूग्णांसह नातेवाईकही घाबरून जातात. डॉक्टरांनी सल्ला न देता स्वत:हून तपासणी करून घेणाऱ्यांची संख्या तर खूपच कमी आहे. त्यामुळे कॅन्सरचे वेळेवर निदान होत नाही. हे चित्र ग्रामीण भागासोबतच शहरामध्येही पहावयास मिळते. दरम्यान, डॉक्टरांच्या म्हणन्यानुसार बहुतांश रूग्ण कॅन्सर दुसऱ्या किंवा तिसऱ्या स्टेजला असल्यानंतर दवाखान्यात येतात. कॅन्सरची प्राथमिक लक्षणे आढळून आल्यानंतरही त्याकडे डोळेझाक केली जाते.
महिलांच्या बाबतीत असे अनुभव अधिक येतात, असे डॉक्टर सांगतात. दरम्यान, सदरील प्रकार लक्षात घेता, आता ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांतूनच कॅन्सरची प्राथमिक तपासणी करण्याचे निर्देश शासनाने जिल्हा परिषद आरोग्य विभागाला दिले आहेत. यासाठी आरोग्य केंद्राच्या ठिकाणी स्वतंत्र महिला कर्मचारी असणार आहे. प्रत्येक केंद्रातील एका आरोग्य सेविकेला कॅन्सर तपासणीच्या अनुषंगाने प्रशिक्षित करण्यात आले आहे. लातूर येथील विवेकानंद कॅन्सर हॉस्पिटलमध्ये संबंधित महिला कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण नुकतेच पूर्ण झाले.
दरम्यान, कॅन्सर टेस्टच्या अनुषंगाने संबंधित महिला कर्मचारी यांना स्वतंत्र किट पुरविण्यात येणार आहे. या किटच्या माध्यमातून ब्रेस्ट कॅन्सर, गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर आणि तोंडाच्या कॅन्सरची प्रामुख्याने तपासणी करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. महिला कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. साधारपणे नवीन वर्षात म्हणजेच जानेवारी २०२० पासून प्रत्यक्ष कॅन्सरच्या चाचणीला सुरूवात करण्यात येणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे यांनी सांगितले.