परांड्यात मविआत दोघांना उमेदवारी! शरद पवार गटाचीही दावेदारी; उध्दवसेना माघार घेणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 01:57 PM2024-10-28T13:57:07+5:302024-10-28T13:58:09+5:30
राष्ट्रवादी (श.प.)चा परांडा मतदारसंघावर दावा होता. तरीही उध्दवसेनेने पहिल्या यादीत दिवंगत माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचा मुलगा रणजित पाटील यांना उमेदवारी जाहीर केली.
- चेतन धनुरे
धाराशिव : उध्दवसेनेने आधीच उमेदवार जाहीर केला असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने शनिवारी धाराशिव जिल्ह्यातील परंडा मतदारसंघात राहुल मोटे यांना उमेदवारी जाहीर केल्याने या मतदारसंघात महाविकास आघाडीत तिढा निर्माण झाला आहे. राहुल मोटे यांनी शुक्रवारीच एबी फॉर्मसह उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
राष्ट्रवादी (श.प.)चा परांडा मतदारसंघावर दावा होता. तरीही उध्दवसेनेने पहिल्या यादीत दिवंगत माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचा मुलगा रणजित पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. परांडामध्ये राष्ट्रवादी (श.प.) ने उमेदवार दिल्यामुळे महाविकास आघाडीमधील जागावाटपाबाबत समन्वय नसल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी (श.प.) चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील मुंबईत म्हणाले की, उध्दवसेनेशी चर्चा करून यातून मार्ग काढू.
दरम्यान, राहुल मोटे यांनी उमेदवारी जाहीर होण्याच्या आधीच अर्ज दाखल केला आहे. तर उध्दवसेनेचे रणजित पाटील यांनी उमेदवारी जाहीर होऊनही अर्ज दाखल केलेला नाही. मोटे यांची उमेदवारी जाहीर झाल्यामुळे उध्दवसेनेचा उमेदवार या मतदारसंघातून माघार घेणार का, हे पाहावे लागणार आहे. रणजित पाटील यांनी माघार घेतल्यास मोटे यांची लढत शिंदेसेनेचे उमेदवार मंत्री तानाजी सावंत यांच्याशी होईल.
पक्षाची मला अधिकृत उमेदवारी
पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मला पक्षाकडून अधिकृत उमेदवारी दिली आहे. त्यामुळे मी मंगळवारी माझा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.
- रणजित पाटील.
कोण आहेत राहुल मोटे?
राहुल मोटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून २००४, २००९ आणि २०१४ या तीन निवडणुकांत विजय मिळविला आहे. मोटे यांनी रणजित पाटील यांचे वडील ज्ञानेश्वर पाटील यांचा दोन वेळा पराभव केला आहे.