पुजाऱ्यावर जीवघेणा हल्ला प्रकरण, अखिल गुरव समाज संघटनेचे उस्मानाबादेत निदर्शने
By सूरज पाचपिंडे | Published: September 23, 2022 05:27 PM2022-09-23T17:27:24+5:302022-09-23T17:27:40+5:30
पुजाऱ्यावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या समाजकंटकावर कारवाईची मागणी
उस्मानाबाद : हिंगोली जिल्ह्यातील घोटा (देवी) येथील पुजाऱ्यास आत्महत्येस जबाबदार असलेल्या व्यक्तीवर कारवाई करण्यात यावी, तसेच अणदूर येथील श्री खंडोबा देवस्थानच्या पुजाऱ्यांवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या समाजकंटकावर कडक कारवाई करावी, या मागणीसाठी श्री खंडोबा देवस्थान ट्रस्ट, अखिल गुरव समाज संघटनेच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.
तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे श्री खंडोबाचे देवस्थान असून या मंदिराचे पुजारी वंश परंपरागत गुरव समाजाचे आहेत. २१ ऑगस्ट २०२२ रोजी मंदिरात किरकोळ वादातून गुरव समाजातील १०-१२ पुजाऱ्यांना गावातील समाजकंटकांनी बेदम मारहाण करून जखमी केले होते. त्याची तक्रार नळदुर्ग पोलिस ठाण्यात दाखल झालेली आहे. या भांडणाचे निमित्त करून गावातील काही लोकांनी मंदिरातील पुजाऱ्यांना व श्री खंडोबा देवस्थान ट्रस्टच्या सदस्यांना लक्ष्य करीत आहेत. तसेच ५० ते ६० लोकांना एकत्र करून वारंवार निषेध मोर्चा काढून खोटे आरोप करून बदनामी केली जात असल्याचे आंदोलक म्हणाले, बदनामी करणाऱ्या समाजकंटकावर कडक कारवाई करण्यात यावी, या मंदिरात दादागिरी गुंडगिरी करणाऱ्यावर कारवाई करावी, मंदिरात कायमस्वरूपी किमान ४ पोलिसांची नेमणूक करावी, तसेच दर रविवारी काढण्यात येणाऱ्या छबिना मिरवणुकीच्या वेळी किमान १० पोलिसांचा बंदोबस्त देण्यात यावा, देवस्थान व गुरव समाजाची शेती पळवण्याचा प्रयत्न करणाऱ्याविरुद्ध करावी, अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी लावून धरली होती.
यावेळी आंदोलन अखिल गुरव समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष ॲड. प्रशांत खंडाळकर, प्रदेश कार्यकारी अध्यक्ष बाळासाहेब स्वामी, सचिन धारूरकर, युवा अध्यक्ष अजित मोकाशे, प्रदेश उपाध्यक्ष गोपाळ नळेगावकर, सुदर्शन मोकाशे, वैभव मोकाशे आदीसह गुरव समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.