गोवंशीय जनावराचे मासं वाहतूक करणारा टेम्पो पकडला
By सूरज पाचपिंडे | Updated: August 18, 2023 18:26 IST2023-08-18T18:25:55+5:302023-08-18T18:26:08+5:30
बेंबळी पोलिसांनी कारवाई : अडीच टन मांस केले जप्त

गोवंशीय जनावराचे मासं वाहतूक करणारा टेम्पो पकडला
धाराशिव : गोवंशीय मांसाची अवैधपणे वाहतूक करीत असलेला आयशर टेम्पो चिखली चौरस्ता येथे पोलिसांनी पकडून दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई बेंबळी पोलिस ठाण्याच्या पथकाने १८ ऑगस्टच्या मध्यरात्री केली.
बेंबळी पोलिस ठाण्याचे पथक १८ ऑगस्ट रोजी तालुक्यातील चिखली चौरस्ता येथे नाकाबंदी करीत होते. यावेळी त्यांना एम.एच. २५ एजे ०९४७ या क्रमांकाच्या आयशर टेम्पोमधून दुर्गंधीयुक्त पाणी गळत असल्याचे दिसले. त्यांनी टेम्पो थांबवून त्याची झडती घेतली. यावेळी उदगीर तालुक्यातील वाढवणा येथील सद्दाम कुरेशी, इंदापूर तालुक्यातील कांदलगाव येथील आसिफ शेख हे दोघे टेम्पोतून २.५ टन गोवंशीय जनावराचे मांस घेऊन जात असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी त्यांना मांस वाहतूक परवाण्याची विचारणा केल्यानंतर त्यांच्याकडे परवाहना नसल्याचे समोर आले. पथकाने ८ लाख किंमतीचा टेम्पो व अंदाजे ३ लाख ७५ हजार रुपये किंमतीचे गोवंशीय जनावरांचे मांस जप्त केले. या प्रकरणी बेंबळी पोलिस ठाण्याचे पोलीस अंमलदार- सचिन कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन नमूद दोघांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.