कोविड नियम पाळून गणेशोत्सव साजरा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:39 AM2021-09-09T04:39:38+5:302021-09-09T04:39:38+5:30
उमरगा : गणेशोत्सव साजरा करण्यासाठी शासनाने कोरोना संदर्भात लागू केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक राज ...
उमरगा : गणेशोत्सव साजरा करण्यासाठी शासनाने कोरोना संदर्भात लागू केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांनी केले.
बुधवारी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उमरगा पोलीस ठाण्याच्या वतीने आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. शहरातील चिंचोळे मंगल कार्यालयात नगराध्यक्षा प्रेमलता टोपगे यांच्या अध्यक्षतेखाली ही शांतता समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी अनुराधा उदमले, प्रभारी तहसीलदार एन.आर. मल्लूरवार, मुख्याधिकारी रामकृष्ण जाधव, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष रणधीर पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
रौशन म्हणाले, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी चार फुटांच्याच मूर्तीची प्रतिष्ठापना करावी, तर घरात दोन फुटांपर्यंत गणपती मूर्ती बसवावी. फिजिकल डिस्टन्स, सॅनिटायझर, मास्क याचा वापर करण्यात यावा, तसेच याबाबत गणेश मंडळांनी आपल्या उपक्रमातून नागरिकांत जनजागृतीही करावी. शांततेत गणेशोत्सव साजरा करून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे. अध्यक्षीय समारोपात नगराध्यक्षा प्रेमलता टोपगे यांनी पालिकेकडून सर्व गणेश मंडळांना यासाठी सहकार्य करण्यात येईल, असे सांगितले.
बैठकीला शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाबुराव शहापुरे, मुस्लीम जमात कमिटीचे अध्यक्ष बाबा औटी, अलीम विजापूरे, नगरसेवक अतिक मुन्शी, याकूब लदाफ, व्यापारी महासंघ कार्याध्यक्ष नितीन होळे, माजी अध्यक्ष सिद्रामप्पा चिंचोळे, भाजपचे माधव पवार, रिपाइं तालुकाध्यक्ष सुभाष सोनकांबळे, वंचित आघाडीचे राम गायकवाड, विनोद कोराळे, निजाम व्हंताळे, सचिन जाधव, योगेश तपासाळे, संदीप चौगुले, नगरसेवक तथा गणराज गणेश मंडळाचे अध्यक्ष बालाजी पाटील, पोलीस पाटील संघटनेचे पदाधिकारी व गणेश मंडळाचे प्रतिनिधी आदींसह सपोनि सिद्धेश्वर गोरे, महेश क्षीरसागर, पोउपनि अमोल मालुसरे, रमाकांत शिंदे, पोकॉ.सुनीता राठोड यांची उपस्थिती होती. पोलीस निरीक्षक मुकुंद आघाव यांनी प्रस्ताविक केले, तर प्रवीण स्वामी यांनी सूत्रसंचालन केले.