भाविकांविना होळी उत्सव साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:19 AM2021-03-29T04:19:18+5:302021-03-29T04:19:18+5:30
तुळजापूर : येथील श्री तुळजाभवानी मंदिरात रविवारी ‘आई राजा उदे उदे, सदानंदीचा उदे उदे’, या गजरात, संबळाच्या वाद्यात पारंपारिक ...
तुळजापूर : येथील श्री तुळजाभवानी मंदिरात रविवारी ‘आई राजा उदे उदे, सदानंदीचा उदे उदे’, या गजरात, संबळाच्या वाद्यात पारंपारिक पद्धतीने बोंब मारीत देवी भक्ताविना मोजक्या पुजारी, सेवेकरी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत पारंपारिक पद्धतीने होळी उत्सव पार पडला.
तत्पूर्वी रविवारी सकाळी श्री तुळजाभवानीचे चरणतीर्थ होऊन पंचामृत अभिषेक पूजा पार पडली. या पूजेनंतर यजमानांच्या नैवेद्य, आरती, अंगारा हे दैनंदिन धार्मिक विधी पार पडले. दरम्यान महंत व भोपी पुजारी बांधवांनी तुळजाभवानीची फाल्गुनी पौर्णिमेनिमित्त विशेष अलंकार पूजा मांडली. अभिषेक संपल्यानंतर धुपारती होऊन अंगारा विधी पार पडला. त्यानंतर संबळाच्या वाद्यात होमकुंडासमोर होळीची विधिवत पूजा महंत व भोपे पुजारी पाटील यांनी केली. सेवेकरी औटी यांनी आणलेल्या अग्नीने महंत भोपी पुजारी व धार्मिक व्यवस्थापक सिद्धेश्वर इंतुले यांनी होळी प्रज्वलित केली. यानंतर होळीस पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून आरती करून बोंबा मारत फेऱ्या मारण्यात आल्या.
यावेळी उपस्थितांनी होळीचे दर्शन घेऊन त्यात श्रीफळ अर्पण केले. यावेळी महंत तुकोजीबुवा, महंत हमरोजी, महंत वाकोजी, भोपे पुजारी पाटील, सेवेकरी आवटी, छत्रे, पलंगे, गोंधळी, मंदिर कर्मचारी जयसिंग पाटील, नागेश शितोळे व कर्मचारी उपस्थित होते. प्रथमच या वर्षी देवी भाविकाविना तुळजाभवानी मंदिरातील होळी उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा झाला.