सीईटी संकेतस्थळ क्रॅश; विद्यार्थ्यांना मन:स्ताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:33 AM2021-07-27T04:33:54+5:302021-07-27T04:33:54+5:30
दहावी परीक्षेच्या निकालावेळीही सर्व्हर क्रॅश झाला होता. त्यामुळे सुमारे १५ लाख ७५ हजार विद्यार्थ्यांना निकाल समजायला विलंब झाला. यामुळे ...
दहावी परीक्षेच्या निकालावेळीही सर्व्हर क्रॅश झाला होता. त्यामुळे सुमारे १५ लाख ७५ हजार विद्यार्थ्यांना निकाल समजायला विलंब झाला. यामुळे आनंद कमी आणि मन:स्तापच जास्त झाला. आता अकरावी परीक्षेसाठी घेण्यात येणाऱ्या सीईटीची नाव नोंदणी करण्यासाठी तयार करण्यात आलेले संकेतस्थळ गेल्या आठवड्यापासून बंद आहे. तांत्रिक बिघाडाचे कारण सांगितले जात असले, तरी मंडळाचा गलथान कारभारच यास कारणीभूत असून, हा बिघाड दूर करण्यात होणाऱ्या दिरंगाईमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्यच धोक्यात आल्याचा आरोप नितीन काळे यांनी केला आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापन गुणांचा सर्व्हरही ठप्प झाल्याने निकालाला विलंब होण्याची भीती निर्माण झाली आहे. यामुळे विद्यार्थी आणि पालकांना होणाऱ्या मनस्तापाची जबाबदारी मंडळाचीच आहे, असे ते म्हणाले. मंडळाने तातडीने या दुरुस्त्या नाही केल्यास भाजपाच्यावतीने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही काळे यांनी दिला आहे.
मराठीचा बोलण्यापुरताच पुळका...
सीईटी परीक्षेसाठी निश्चित केलेल्या विषयांमध्ये इंग्रजी, गणित, सामान्य विज्ञान आणि विज्ञान हे विषय आहेत. यामध्ये मराठी आणि हिंदी भाषा विषयांचा समावेश नाही. यामुळे मायबोली मराठीची आणि राष्ट्रभाषा हिंदीची गळचेपी होत आहे. एरवी मराठीचा पुळका आणणारी महाविकास आघाडी प्रत्यक्षात मात्र मराठीची गळचेपी करीत असल्याचा आरोप करीत या भाषांचा वैकल्पिक विषय म्हणून तातडीने समावेश करावा, अशी मागणीही नितीन काळे यांनी केली.