प्रभावी उपाययोजना राबवून तोडली कोरोनाची साखळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:25 AM2021-05-30T04:25:55+5:302021-05-30T04:25:55+5:30
लोहारा : तालुक्यातील फणेपूर येथे ग्रामपंचायतचे प्रभावी नियोजन आणि ग्रामस्थांनी घेतलेली काळजी यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला रोखण्यात यश आले ...
लोहारा : तालुक्यातील फणेपूर येथे ग्रामपंचायतचे प्रभावी नियोजन आणि ग्रामस्थांनी घेतलेली काळजी यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला रोखण्यात यश आले असून, सध्या हे गाव पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहे.
६६८ लोकसंख्येचे हे स्वच्छता अभियान तसेच शासनाच्या विविध योजना राबविणारे गाव म्हणून परिचित आहे. या गावात कोरोनाच्या पहिल्या लाटेत बोटावर मोजण्याइतकेच कोरोनाचे रुग्ण आढळले होते. त्यात एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. परंतु, तो पुण्यातच राहत होता. त्यांचा मृत्यूही तेथेच झाल्याने अंत्यविधी तेथेच करण्यात आले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गावात १६ रुग्ण आढळून आले. त्यामुळे प्रशासनाने तातडीने उपाययोजना सुरू केल्या. ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ या अंतर्गत आशा कार्यकर्ती, शिक्षक, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक यांच्यामार्फत गृहभटी देऊन आरोग्याची माहिती संकलित करण्यात आली. याशिवाय आशा, अंगणवाडी कार्यकर्तींमार्फत प्रत्येक कुटुंबातील सदस्यांची ऑक्सिजन पातळी व तापमान तपासून संशयितांवर तत्काळ उपचार करण्यात आले. या सर्व उपाययोजनांमुळे हे सर्व रुग्ण बरे झाले. ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी यानंतरही आवश्यक खबरदारी घेणे सुरूच ठेवल्याने पुन्हा या गावात कोरोनाला शिरकाव करता आला नाही. त्यामुळे सध्या तरी हे गाव कोरोनामुक्त आहे.
कोट..........
ग्रामस्थांनी कोरोनाला न घाबरता नियमाचे पालन करत प्रशासनाला मदत केली. यामुळे गावात सध्या एकही कोरोनाचा रुग्ण नाही. यापुढेही अशीच काळजी ग्रामस्थ घेणार आहेत.
- मुक्ताबाई भोजणे, माजी सरपंच
गाव कोरोनामुक्त राहावे यासाठी ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ अंतर्गत आशा कार्यकर्ती, शिक्षक, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक यांच्यामार्फत गृहभेटी देण्यात आल्या. आशा, अंगणवाडी कार्यकर्तींमार्फत प्रत्येक नागरिकाच्या शरीरातील तापमान व ऑक्सिजन पातळीची तपासणी केली गेली. यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखणे शक्य झाले.
- आशिष गोरे, ग्रामसेवक
गाव कोरोनामुक्त करण्यासाठी ग्रामपंचायतीने वेळोवेळी बैठक घेऊन गावातील सर्व कर्मचाऱ्यांना उपाययोजनांबाबत सूचना केल्या. तसेच कोरोना टेस्ट व लसीकरण याबाबतही जनजागृती केली. गावात ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ अभियानही राबविले. यामुळे गाव कोरोनामुक्त झाले.
- साहेराबी आयुब मुल्ला, सरपंच