निजामकालीन इमारतीत पोलीस ठाण्याचा कारभार
By Admin | Published: June 1, 2017 12:37 AM2017-06-01T00:37:50+5:302017-06-01T00:41:36+5:30
शिराढोण : कळंब तालुक्यातील शिराढोण येथील पोलीस स्टेशन निजाम काळात १९२० मध्ये पत्र्याचे छत असलेल्या इमारतीमध्ये कामकाज चालते.
राहूल ओमने।
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराढोण : कळंब तालुक्यातील शिराढोण येथील पोलीस स्टेशन निजाम काळात १९२० मध्ये पत्र्याचे छत असलेल्या इमारतीमध्ये कामकाज चालते. पावसाळ्यात छताला गळती लागते. उपलब्ध निवास्थानांचीही दुरवस्था झाली असून, याकडे लक्ष देण्याची मागणी जोर धरत आहे.
कळंब तालुक्यातील ९३ गावांपैकी शिराढोणमध्ये पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात तब्बल ४० गावे व १२ वस्त्या आणि पारधी पिढ्या आहेत. उर्वरित ५३ गावांमध्ये कळंब आणि येरमाळा अशा दोन पोलीस ठाण्यांचे कार्यक्षेत्र आहे. यामुळे कळंब तालुक्यातील सर्वात मोठे कार्यक्षेत्र असलेले पोलीस स्टेशन म्हणून शिराढोण पोलीस स्टेशनची ओळख आहे. या ठाण्याची इमारत १९२० मध्ये निजामकाळातील दगडी बांधकामाची आहे. इमारतीचे दगडी बांधकाम मजबूत असले तरी छतावर पत्रे असल्याने पावसाळ्यात याला गळती लागते.
शिवाय इमारत अपुरी असल्याने कर्मचाऱ्यांना दैनंदिन कामकाज करण्यासाठी कसरत करावी लागत आहे. ९७ वर्षांपूर्वीच्या कोठडीमध्ये आरोपींना ठेवण्यात येते. ही जागा अतिशय कमी असल्याने दहापेक्षा अधिक आरोपींना ठेवण्यासाठी पोलिसांना कसरत करावी लागत आहे. शिराढोण पोलिसांच्या निवासस्थानाचे बांधकाम करून जवळपास तीन दशकाच्या वर कालावधी लोटला. हे बांधकाम कौलारू पद्धतीचे असून, याचीही दुरवस्था झाली आहे. अधिकारी व पोलिसांची संख्या ४७ झाली असून, निवास्थान मात्र १५ ते २० कर्मचाऱ्यांपुरतेच आहेत. पोलिसांनी मुख्यालयी राहण्याची सक्ती असल्याने त्यांना खाजगी जागेत रहावे लागत आहे. त्यामुळे येथे नवीन वाढीव निवासस्थान बांधण्याची मागणी होत आहे.
प्रस्ताव पाठविला
शिराढोण पोलीस स्टेशनमध्ये सध्या महिला कक्षाचे बांधकाम सुरू आहे. नवीन इमारतीचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविला असून, यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता पाटील यांनी सांगितले.