भुजबळांचा जबरा फॅन; दोन वर्ष ‘त्यानं’ दाढी अन् केस कापलेच नाहीत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2018 10:34 AM2018-05-06T10:34:31+5:302018-05-06T10:42:23+5:30
गावात चेष्टेचा विषय ठरुनही दोन वर्ष केसांना कात्री लावली नाही
कळंब (जि. उस्मानाबाद) : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ दोन वर्षानंतर तुरुंगातून बाहेर येणार आहेत. या काळात वाढत्या वयामुळे थकलेले, दाढी वाढलेले भुजबळ अनेकदा पाहायला मिळाले. मात्र भुजबळ तुरुंगात आहेत म्हणून उस्मानाबादच्या कळंबमधील त्यांच्या एका चाहत्यानंही तब्बल दोन वर्ष दाढी आणि केस कापले नाहीत.
आपले नेते आपल्याला ओळखत असोत वा नसोत, तरीही त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या त्यांच्या चाहत्यांची संख्या कमी नसते. नेत्यांवर प्रेम करणारे असे अनेक चाहते पाहायला मिळतात. कळंब तालुक्यातील मोहा येथे राहणाऱ्या बिभीषण माळी हे त्यापैकीच एक. भुजबळ तुरुंगात जाताच त्यांच्यावर अतिशय प्रेम करणाऱ्या बिभीषण माळी यांनी संकल्प केला. 'साहेब जोपर्यंत तुरुंगातून बाहेर येत नाहीत, तोपर्यंत दाढी आणि केस कापणार नाही', असा निश्चय त्यांनी केला आणि तो पूर्णत्वासही नेला.
मोहा येथे वास्तव्यात असणारे 35 वर्षांचे बिभीषण राजाराम माळी उदरनिर्वाहासाठी गावातच पान टपरीचा व्यवसाय करतात. यावर कुटुंबाचा आर्थिक गाडा हाकणं अवघड असल्यानं ते गावातील एका संस्थेची दैनंदिन ठेव संकलित करतात. कौटुंबिक स्थिती अशी साधारण असलेल्या मोहा येथील बिभीषण माळी यांचा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यावर कमालीचा जीव. आयुष्यात सबकुछ 'भुजबळ' असलेल्या या कार्यकर्त्याचे नेत्यावरील प्रेम गावातील सर्वांना माहित आहे. गावात जरी बिभीषण यांच्या भुजबळ प्रेमाची चर्चा असली, तरी भुजबळांना यांना याबद्दल कोणतीही कल्पना नाही. मात्र तरीही भुजबळ तुरुंगात जाताच त्यांनी दाढी आणि केस न कापण्याचा संकल्प केला.
महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा, मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात भुजबळांना दोन वर्षांपूर्वी अटक झाली. त्यानंतर त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली. मात्र इतकं सारी होऊनही भुजबळांवर निस्सिम प्रेम करणाऱ्या बिभीषण यांची श्रद्धा जराही ढळली नाही. 'साहेब जामिनावर बाहेर आल्याशिवाय केसाला कात्री लावणार नाही' अशी प्रतिज्ञा त्यांनी केली. गेल्या २६ महिन्यांपासून बिभीषण यांनी दाढी केलेली नाही. तसेच केसही कापलेले नाहीत. यामुळे एखाद्या 'बुवा'सारखे दिसू लागलेले बिभीषण गावात चेष्टेचा ठरले. मात्र तरीही त्यांनी माघार घेतली नाही.
आता भुजबळांना भेटणार
शुक्रवारी छगन भुजबळ यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला. ही बातमी समजताच बिभीषण यांना मोठा आनंद झाला. आता ते छगण भुजबळ यांची पुढील काळात प्रत्यक्षात भेट घेणार आहेत. ही भेट झाल्यानंतरच आपण केस कापणार असल्याचं बिभीषण यांनी सांगितलं.