मुलाच्या दोन्ही किडनी फेल, आई देण्यास तयार पण प्रत्यारोपणासाठी पैसे नाहीत; दानशूरांची गरज
By बाबुराव चव्हाण | Published: August 12, 2023 06:19 PM2023-08-12T18:19:32+5:302023-08-12T18:20:54+5:30
मजूर कुटुंबाची व्यथा; पोटच्या गोळ्याला वाचविण्याची पालकांची धडपड
- दत्ता पवार
येडशी (जि. धाराशिव) : प्रथमेशच्या जन्मानंतर घरात आनंदाचे वातावरण हाेते. मात्र, अवघ्या ११ महिन्यांतच प्रथमेशची एक किडनी निकामी झाल्याचे डाॅक्टरांनी निदान केले अन् आनंदावर विरजण पडले. ही किडनी काढून टाकल्यानंतर ताे आजवर एकाच किडनीवर हाेता. मात्र, काही दिवसांपूर्वी दुसऱ्या किडनीनेही साथ साेडली. आता त्याच्या आयुष्याची दाेरी ‘डायलिसिस’वर निर्भर आहे. पाेटच्या गाेळ्याला जीवनदान देण्यासाठी आईने किडनी देऊ केली. मात्र, आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने ५ लाखांअभावी किडनी प्रत्यारोपण थांबले आहे. प्रथमेशला जीवनदान देण्यासाठी आता गरज आहे, ती समाजातील दानशूर व्यक्तींकडून आर्थिक मदतीची.
दत्तात्रय सस्ते यांची काैटुंबिक आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. गावातीलच एका हाॅटेलमध्ये मजूर म्हणून काम करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. प्रथमेशचा जन्म झाल्यानंतर कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण हाेते. मात्र, अकराव्या महिन्यांतच प्रथमेशची एक किडनी फेल झाल्याचे डाॅक्टरांनी निदान केले अन् सस्ते कुटुंबीयांना धक्का बसला. यानंतर डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार ही किडनी काढून टाकण्यात आली. तेव्हापासून प्रथमेश एकाच किडनीवर हाेता. या काळात त्याने दहावीपर्यंतचे शिक्षणही पूर्ण केले.
सर्वकाही बऱ्यापैकी सुरू असतानाच काही दिवसांपूर्वीच प्रथमेच्या दुसऱ्या किडनीनेही त्याची साथ साेडली. तेव्हापासून प्रथमेश ‘डायलिसिस’वरच आहे. डाॅक्टरांनी किडनी प्रत्याराेपणाचा सल्ला दिल्यानंतर पाेटचा गाेळ्यास जीवनदान देण्यासाठी आई अश्विनी सस्ते यांनी आपली किडनी देऊ केली. मात्र, रुग्णालयाकडून प्रत्याराेपणासाठीचा खर्च तब्बल ५ लाख रुपये सांगण्यात आला. जिथं दिवसभर काम केलं तर चूल पेटते, तिथं ५ लाख आणायचे काेठून, असा प्रश्न दत्तात्रय यांच्यासमाेर उभा ठाकला. आपल्या पातळीवर त्यांनी प्रयत्नही केले. मात्र, पैसे काही जमले नाहीत. त्यामुळे प्रथमेश आजही ‘डायलिसिस’वरच आहे. त्याला जीवनदान देण्यासाठी आता गरज आहे ती, समाजातील दानूशर व्यक्तींच्या मदतीची. इच्छुक ९३०७५६९९२१ या माेबाईल क्रमांकावर दत्तात्रय सस्ते यांच्याशी संपर्क करू शकतात.
दानशूर व्यक्तींनी मदत करावी...
सतरा वर्षाचा मुलगा दाेन्ही किडन्या निकामी झाल्याने डायलिसिसवर आहे. त्याच्या आईने किडनी देऊ केली आहे. मात्र, रुग्णालयाकडून पाच लाखांचा खर्च सांगितला आहे. मी हाॅटेलमध्ये मजूर म्हणून काम करून कुटुंब कसंबसं चालविताे. त्यामुळे एवढे पैसे आणणार काेठून?. समाजातील दानशूर व्यक्तींनी आपापल्या परीने आर्थिक मदत करावी, असे आवाहन दत्तात्रय सस्ते यांनी ‘लाेकमत’शी बाेलताना केले.