‘नोकरी’ची गॅरंटी नसल्याने ‘छोकरी’ची निवड लांबणीवर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:31 AM2021-07-29T04:31:57+5:302021-07-29T04:31:57+5:30
उस्मानाबाद : कोरोना काळात अनेकांना नोकरीला मुकावे लागले. त्यात काहींना वर्क फ्रॉम होम दिल्याने पगारात कपात करण्यात आली आहे. ...
उस्मानाबाद : कोरोना काळात अनेकांना नोकरीला मुकावे लागले. त्यात काहींना वर्क फ्रॉम होम दिल्याने पगारात कपात करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत अनेकांनी लग्न लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला. ही बाब नोंदणी विवाहाच्या संख्येत झालेल्या घट पाहता लक्षात येते. जिल्ह्यात सात महिन्यात ७ नोंदणी विवाह झाले आहेत.
कोट..
कोरोना काळात नोंदणी विवाहांची संख्या वाढेल, अशी अपेक्षा होती. परंतु विवाह नोंदणी कमी झाली आहे. कामाची शाश्वती नसल्याने लग्न लांबणीवर टाकणे कारण असू शकते.
आर. बी. पवार
विशेष विवाह नोंदणी अधिकारी
प्रतिक्रिया...
कोरोनाच्यापूर्वी पुणे येथे कंपनीत जॉबला होतो. त्या ठिकाणी चांगला पगार मिळत होता. यंदा लग्न करण्याचे ठरविले होते. मात्र, कामावरून कमी केल्याने गावी आलो. त्यामुळे आता नवीन ठिकाणी जॉब मिळाल्यानंतरच लग्न करणार आहे.
राहुल शिंदे, तरुण
मागील चार वर्षांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे. मात्र, दोन वर्षांपासून जागा निघत नाहीत. लग्न जमविताना नोकरी विचारली जाते त्यामुळे अनेक तरुण खासगी कंपनीत कामे करीत आहेत. लॉकडाऊन काळात त्या ठिकाणीही पगार कपात केली जात आहे. नोकरीची शाश्वत हमी नसल्याने लग्न पुढे ढकलले आहे.
विशाल राऊत, तरुण
कोरोना काळात नोंदणी विवाहाचे प्रमाण वाढेल, अशी अपेक्षा होती. या उलट या काळात नोंदणीचे प्रमाण घटले आहे.
मागील सात महिन्यात सात जणांनी नोंदणी विवाह करून आपले संसार थाटले आहेत.
दोन वर्षांपूर्वी कोरोना नसताना नोंदणी विवाहाचे प्रमाण जास्त होते. २०१८ मध्ये त्याहून अधिक नोंदणी झाली.
गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून कोरोनाचे रुग्ण आढळून येऊ लागले. कोरोना संसर्गाचा फटका सर्वच क्षेत्रांना बसला आहे. विशेषत: राज्य शासनाने विविध विभागात कोरोनामुळे पदभरतीला ब्रेक लावला. त्यामुळे शिक्षित असूनही बेरोजगार राहण्याची तरुणांवर वेळ ओढवली आहे. परिणामी, वय झाले असले तरी लग्न करू शकत नाही नोंदणी विवाहाचा तर प्रश्नच नाही. असे वास्तव आहे. त्यामुळे कोरोना काळात विवाहासाठी नोंदणीचे प्रमाण नगण्य आहे.
कधी किती झाले नोंदणी विवाह
२०१८ ४१
२०१९ ३५
२०२० ३५
२०२१ जानेवारी ३
२०२१ फेब्रुवारी २
२०२१ मार्च १
२०२१ एप्रिल १
२०२१ मे ०
२०२१ जून ०
२०२१ जुलै ०