निर्णयप्रक्रियेत नागरिकांचा थेट समावेश उपक्रमाला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:37 AM2021-07-14T04:37:53+5:302021-07-14T04:37:53+5:30
कळंब : नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी निर्णय प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग घेण्याची अभिनव व राज्यात बहुदा प्रथमच राबविलेल्या उपक्रमास कळंबकरांनी भरभरून ...
कळंब : नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी निर्णय प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग घेण्याची अभिनव व राज्यात बहुदा प्रथमच राबविलेल्या उपक्रमास कळंबकरांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. नगरपालिका स्तरावर यातील पूर्ण होऊ शकणाऱ्या कामांना मंजुरीसाठी आगामी सर्वसाधारण सभेत ठेवले जाणार आहे.
कळंब न. प.मध्ये मागील साडेचार वर्षांच्या कालावधीत विविध विकासकामे पार पडली. काही कामे प्रगतिपथावर आहेत. २४ जुलै रोजी नियमित नगराध्यक्ष सुवर्णा मुंडे या रजेवर गेल्याने उपनगराध्यक्ष संजय मुंदडा यांनी प्रभारी नगराध्यक्षपद स्वीकारले. या निवडीनंतर मुंदडा यांनी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत नागरिकांतून आलेल्या मागण्यांचा समावेश करण्याचा बहुदा राज्यातील पहिलाच प्रयोग करण्याचे जाहीर केले. यासाठी शहरातील नागरिकांनी आपापल्या भागातील समस्या, तक्रारी, मागण्या, सूचना देण्याचे आवाहन केले होते. यासाठी दोन कर्मचाऱ्यांची विशेष नियुक्तीही केली. काही राजकीय विरोधकांनी यावर टीकाही केली. मात्र, या अभिनव उपक्रमास मिळालेल्या प्रतिसादामुळे नागरिकांनाही थेट न. प.पर्यंत पोहोचता आल्याचे चित्र समोर आले आहे.
शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणात होतो आहे. त्यामुळे नागरी समस्याही वाढत आहेत. अनेकदा राजकीय, वैयक्तिक हेवेदाव्यामुळे अनेक समस्या न. प. पुढे येत नाहीत. या पार्श्वभूमीवर कळंब नगरपालिकेने राबविलेला हा उपक्रम नक्कीच नागरिकांच्या समस्या काही प्रमाणात का होईना मार्गी लावण्यासाठी कारणीभूत ठरू शकेल, अशी अपेक्षा शहरवासीयांतून व्यक्त होते आहे.
कोट....
सर्वसाधारण सभेमध्ये थेट नागरिकांना सहभागी करून घेण्याच्या या बहुदा राज्यातील पहिल्याच उपक्रमाला निश्चित प्रतिसाद मिळेल, ही अपेक्षा होती. परंतु, कळंबकरांना ही संकल्पना इतकी आपली वाटेल ही कल्पना नव्हती. शहरातील प्रत्येक भागातून महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक, कामगार, मजूर, व्यापारी आदी विविध घटकांनी यामध्ये सहभाग घेतला आहे. यातील न. प. स्तरावर होऊ शकणारी कामे मंजुरीसाठी आम्ही आगामी सर्वसाधारण सभेत घेत आहोत. जी कामे न. प.च्या अधिकारात नाहीत त्याची शिफारस आम्ही संबंधित यंत्रणेला करणार आहेत.
- संजय मुंदडा, प्रभारी नगराध्यक्ष