दिव्यांगांसाठी कलेक्टर आले ‘जमिनीवर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 06:56 PM2020-09-28T18:56:24+5:302020-09-28T18:58:44+5:30
उस्मानाबाद : एका लहानश्या कामाच्या परवानगीसाठी गेलेल्या काही दिव्यांग बांधवांची मने सोमवारी उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी जिंकून घेतली. दिव्यांगांची मागणी ऐकण्यासाठी जिल्हाधिकारी त्यांचा कलेक्टरी रूबाब सोडून थेट जमिनीवर मांडी घालून बसले. त्यांच्या या कृतीने दिव्यांग बांधवही क्षणभर आवाक झाले. मिजास दाखविणाऱ्या व्यक्तीला ‘काय मोठा कलेक्टर ...
उस्मानाबाद : एका लहानश्या कामाच्या परवानगीसाठी गेलेल्या काही दिव्यांग बांधवांची मने सोमवारी उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी जिंकून घेतली. दिव्यांगांची मागणी ऐकण्यासाठी जिल्हाधिकारी त्यांचा कलेक्टरी रूबाब सोडून थेट जमिनीवर मांडी घालून बसले. त्यांच्या या कृतीने दिव्यांग बांधवही क्षणभर आवाक झाले.
मिजास दाखविणाऱ्या व्यक्तीला ‘काय मोठा कलेक्टर लागून गेला का?’, असे संबोधले जाते. जनसामान्यांच्या मनात कलेक्टरची रूजलेली ही प्रतिमा जिल्हाधिकाऱ्यांच्या या कृतीने मात्र जरा डगमगीत झाली. उस्मानाबाद येथील अपंग जनता दल सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष रसूल सय्यद, तालुकाध्यक्ष सलीम पठाण, शहराध्यक्ष विठ्ठल गायकवाड व काही पदाधिकारी सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे गेले होते़. त्यांच्या संघटनेची उस्मानाबाद येथे बैठक होणार असून त्यात कार्यकारिणी निवडण्यात येणार आहे़.
या बैठकीची माहिती दिव्यांग बांधवांना होण्यासाठी त्यांना बॅनर लावण्याची परवानगी हवी होती़. त्यासाठीचे पत्र देण्यासाठी हे पदाधिकारी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात गेले़ असता त्यातील एक प्रमुख सदस्य बसूनच सरपटत जिल्हाधिकाऱ्यांच्या टेबलपर्यंत गेले़. हे दृश्य पाहून दिवेगावकर आपल्या खुर्चीतून उठले आणि त्यांच्यापर्यंत गेले व जमिनीवर बसूनच त्यांनी दिव्यांग बांधवांशी चर्चा केली.