अस्वच्छतेबाबत जिल्हाधिकारी नाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:28 AM2021-03-22T04:28:53+5:302021-03-22T04:28:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कळंब : शहरातील अस्वच्छता, सार्वजनिक ठिकाणांना आलेले कचराकुंडीचे स्वरूप व त्यामुळे धोक्यात आलेल्या शहरवासियांच्या आरोग्याबाबत जिल्हाधिकारी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कळंब : शहरातील अस्वच्छता, सार्वजनिक ठिकाणांना आलेले कचराकुंडीचे स्वरूप व त्यामुळे धोक्यात आलेल्या शहरवासियांच्या आरोग्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. कौस्तुभ दिवेगावकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर नगर परिषद प्रशासन खडबडून जागे झाले आहे. प्रभारी मुख्याधिकारी आशिष लोकरे यांनी संबंधित कंत्राटदाराला नोटीस बजावली आहे.
कळंब शहरातील वाढती कोरोनाबाधितांची संख्या पाहता, जिल्हाधिकारी डॉ. दिवेगावकर यांनी नुकतीच कळंब शहरातील परिस्थितीची पाहणी केली. शहरातील प्रतिबंधात्मक भागाची पाहणी करताना ठिकठिकाणी तुंबलेली गटारे, कचऱ्याचे ढिगारे, रस्त्यावरून वाहणारे घाण पाणी याचे दर्शन त्यांना झाले.
शहरातील कोरोनाबाधितांची संख्या दोन-तीन दिवसात १००च्या घरात गेली असताना, नगर परिषद प्रशासन शहर स्वच्छतेची खबरदारी घेत नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनाला आले. यावेळी त्यांनी शहरातील या अस्वच्छतेबद्दल उपस्थित अधिकारी तसेच नगर परिषद प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांकडे तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली होती. शहर स्वच्छ नसेल तर कोणत्याही रोगांना कसा अटकाव करणार, असा प्रश्नही यावेळी काही नागरिकांनी विचारला.
यानंतर खडबडून जागे झालेल्या नगर परिषद प्रशासनाने शहर स्वच्छतेचे कंत्राट घेतलेल्या पुणे येथील स्वयंभू ट्रान्सपोर्टचे संचालक सचिन भापकर यांना शुक्रवारीच नोटीस बजावली. या नोटीसमध्ये जिल्हाधिकारी यांच्या पाहणीचा संदर्भ देऊन त्यांनी शहरातील कचऱ्यासंदर्भात अत्यंत नाराजी व्यक्त केल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे.
संबंधित कंत्राटदार कंपनीला या अगोदर वेळोवेळी कामगारांची संख्या वाढवण्याचे कळवूनही त्यांनी ती वाढवली नसल्याचे या नोटीसमध्ये म्हटले आहे. आगामी काळात शहरातील घनकचरा व्यवस्थापनाचे काम असमाधानकारक झाल्यास दंडात्मक कारवाई करण्याचा तसेच ठेका रद्द करण्याचा इशाराही संबंधित कंत्राटदाराला प्रभारी मुख्याधिकारी आशिष लोकरे यांनी नोटीसद्वारे दिला आहे.
शहर स्वच्छतेबाबत खुद्द जिल्हाधिकारी यांनी नगर परिषद प्रशासनाचे कान धरल्याने आतातरी शहरातील बकालपणा कमी होईल, अशी आशा शहरवासियांमधून व्यक्त केली जात आहे.
चौकट -
तर कंत्राटदारावर कडक कार्यवाही
नगराध्यक्षा मुंडे
शहरातील स्वच्छतेचे कंत्राट घेतलेल्या कंपनीला नोटीस बजावली आहे. प्रतिबंधात्मक क्षेत्र तसेच संपूर्ण शहरात फवारणी करण्याचे आदेशही संबंधिताला दिले आहेत. यानंतरही त्यांनी पूर्ण क्षमतेने काम केले नाही तर कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती नगराध्यक्षा सुवर्णा मुंडे यांनी दिली.
चौकट-
आतातरी न. प.ने जागे व्हावे - अमर चाऊस
शहरातील विविध भागात कचऱ्याचे ढीग साठले आहेत. नाले सफाई व्यवस्थित होत नाही, सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता आहे. खुद्द जिल्हाधिकारी यांनी याबाबत नाराजी व्यक्त केल्यानंतर व शहरात कोरोनाने थैमान घातले असताना तरी नगर परिषद प्रशासनाने शहर स्वच्छतेला गांभीर्याने घ्यावे तसेच संबंधित कंत्राटदाराला पाठीशी घालू नये, अशी अपेक्षा शहरातील कल्पना नगर भागातील सामाजिक कार्यकर्ते अमर चाऊस यांनी व्यक्त केली.
फोटो कॅप्शन -
कळंब शहरातील विविध भागांची जिल्हाधिकारी डॉ. कौस्तुभ दिवेगावकर यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी शहरातील अस्वच्छतेबद्दल नाराजी व्यक्त केली.