जिल्हाधिकाऱ्यांचा दणका; तुळजाभवानी खजिन्यात हेराफेरी प्रकरणात गुन्हा नोंदविण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 11:26 PM2020-09-10T23:26:54+5:302020-09-10T23:28:37+5:30
या बहुचर्चित खजिना गैरव्यवहार प्रकरणात उशिरा का होईना आता अखेर गुन्हा दाखल होत आहे.
उस्मानाबाद : श्री तुळजाभवानी देवीच्या प्राचीन खजिन्यातील दुर्मिळ व मौल्यवान वस्तूत हेराफेरी झाल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. यानुषंगाने तत्कालीन जबाबदार अधिकाऱ्यावर गुन्हा नोंदविण्याचे आदेश गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. या आदेशावर रात्री उशिरा त्यांनी स्वाक्षरी केली.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या प्राचीन खजिना व जामदार खान्यात ऐतिहासिक व मौल्यवान अलंकार, सोन्या-चांदीचे दागिने, जडजवाहीर व प्राचीन नाणी होत्या. यातील काही मौल्यवान वस्तू तत्कालीन अधिकाऱ्यांनी गैरव्यवहार करून ताब्यात घेतल्याची तक्रार मंदिर प्रशासन व जिल्हा प्रशासनाकडे देण्यात आली होती. त्यानुसार, अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी करण्यात आली. या चौकशीत तत्कालीन धार्मिक सहव्यवस्थापक दिलीप देवीदासराव नाईकवाडी यांनी हेतूत: गैरव्यवहार केल्याचे निष्पन्न झाले होते. तसा अहवालही सादर करण्यात आला होता. शिवाय, 8 एप्रिल 2020 रोजी गृह विभागाच्या उपसचिवांनीही जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन या प्रकरणात नाईकवाडी यांच्याशिवाय इतर कोणाचाही बेकायदेशीर हेतू दिसत नसल्याचे कळविले होते.
यानुषंगाने नाईकवाडी यांच्यावर गुन्हा नोंदविण्याची शिफारसही करण्यात आली होती. यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी पोलीस अधीक्षकांना पत्र देऊन तातडीने कार्यवाही करण्याची सूचना केली. दरम्यान, पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून मागील महिन्यात याप्रकरणात तक्रार देण्यासाठी प्राधिकृत अधिकारी नेमावा व आवश्यक कागदपत्रे व तक्रार तुळजापूर ठाण्यात द्यावी, असे कळविण्यात आले. त्याप्रमाणे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या व्यवस्थापक तथा तहसीलदार यांना प्राधिकृत करून दिलीप नाईकवाडी यांच्याविरुद्ध तुळजापूर ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश काढले आहेत. गुरुवारी रात्री या आदेशावर त्यांची स्वाक्षरी झाली असून, शुक्रवारी याप्रकरणी गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.
या बहुचर्चित खजिना गैरव्यवहार प्रकरणात उशिरा का होईना आता अखेर गुन्हा दाखल होत आहे. मंदिर संस्थानच्या बाबतीत जिल्हाधिकारी तथा संस्थानचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी घेतलेला हा पहिलाच निर्णय धडाकेबाज ठरला आहे.